Aditya Thackeray : गुढीपाडव्याचा प्रचंड उत्साह आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी दिसून येतो आहे. नागपूर, ठाणे, गिरगाव, डोंबिवली, कल्याण या शहरांमध्ये शोभायात्रा आणि विविध प्रकारच्या कार्यक्रमांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. दरम्यान गिरगावच्या शोभायात्रेत आदित्य ठाकरेंनी ( Aditya Thackeray) ढोलवादन केलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

काय आहे व्हिडीओत?

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे गिरगावच्या शोभायात्रेत सहभागी झाले होते. त्यांनी आज उत्साहात ढोलवादन केलं. साधारण ४५ सेकंदांच्या या व्हिडीओत आदित्य ठाकरे हे उत्साहात ढोलवादन करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ शिवसेना ठाकरे गटानेच पोस्ट केला आहे. त्यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहीर दिसत आहेत. मुंबईतल्या गिरगावत सकाळपासूनच शोभायात्रा, बाईक रॅली, चित्र रथ यांचा उत्साह दिसून येतो आहे. आजा गुढीपाडवा असल्याने हिंदू नववर्षाचं स्वागत करण्यासाठी सगळेच गिरगावकर सज्ज झालेले दिसले. दरम्यान आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांनी ढोलवादन करत आपला सहभाग दर्शवला.

गिरगावात १९९९ पासून शोभायात्रा

गिरगावात १९९९ पासून शोभायात्रा काढली जाते. डोंबिवली, ठाणे या ठिकाणीही शोभायात्रा काढली जाते. गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी काढल्या जाणाऱ्या या शोभायात्रेत लोकांसह, सेलिब्रिटी नेतेमंडळीही उत्साहाने आणि आनंदाने सहभागी होतात. आज आदित्य ठाकरेंनीही त्याच जोषात ढोलवादन करुन आपला सहभाग शोभायात्रेत नोंदवला. त्यांच्या ढोलवादनाचा व्हिडीओ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने पोस्ट केला आहे.

आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा आमदार

आदित्य ठाकरे २०१९ आणि २०२४ अशा दोन विधानसभा निवडणुकांमध्ये वरळी मतदारसंघातून निवडून आले आहेत. ठाकरेंच्या घराण्यातले आदित्य ठाकरे हे पहिलेच आमदार आहेत. कारण प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे ते अगदी राज ठाकरेंपर्यंत कुणीही निवडणूक लढवलेली नव्हती. आदित्य ठाकरेंनी २०१९ मध्ये वरळीतून निवडणूक लढवली आणि ते निवडून आले. तसंच २०२४ मध्येही आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) आमदार झाले. लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न ते एरवीही करत असतात. तसंच विधानसभेत लोकांच्या प्रश्नावर आवाज उठवताना दिसतात. आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने ते गुढीपाडवा शोभायात्रेत सहभागी झाले होते. आज गिरगावात आदित्य ठाकरेंनी ढोलवादनाचा आनंद लुटला.