रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना त्यांच्या खात्यातील घडामोडींबाबतही माहिती नसते, अशी टीका युवा सेनेचे प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी येथे केली.
राज्यातील सत्तांतरानंतर युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी गेल्या महिन्यात रायगड, सिंधुदुर्गासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये संवाद निष्ठा यात्राह्ण या नावाने झंझावाती दौरे केले. मात्र त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश नव्हता. म्हणून शुक्रवारी दिवसभरात त्यांनी रत्नागिरी, चिपळूण आणि दापोलीत सभा-मेळावे घेऊन पक्षकार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. उद्योगमंत्री सामंत यांचा मतदारसंघ असलेल्या रत्नागिरीत झालेल्या सभेत आदित्य यांनी मुख्यत्वे नवीन सरकारला उद्योग क्षेत्रात आलेल्या अपयशावर टीकेची झोड उठवली. विशेषत:, सेमीकंडक्टर उत्पादनाचा वेदान्त-फाक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याचे खापर त्यांनी राज्य सरकार आणि उद्योग खात्यावर फोडले. आदित्य म्हणाले की, या डबल इंजिनच्या सरकारला हा प्रकल्प महाराष्ट्रात थांबवता आला नाही. यांचे एक इंजिन बंद पडले आहे, तर खुद्द राज्याच्या उद्योगमंत्र्यांनाच याबाबत नेमकी वस्तुस्थिती माहीत नाही. या संदर्भात काही विचारले की ते म्हणतात, माहिती घेऊन सांगतो. राज्यात एक लाख रोजगार देऊ शकणारा प्रकल्प गुजरातला गेला, हे राज्याचे दुर्दैव आहे. येथील उद्योगमंत्र्यांनी केवळ शिवसेनेशी गद्दारी केली नाही, तर महाराष्ट्राशी गद्दारी केली आहे. राज्यात येऊ घातलेले प्रकल्प या खोके सरकारह्णने गुजरातला पाठवले आणि त्याचे खापर आमच्या सरकारवर फोडत आहेत. त्यांना आपले अपयश लपवायचे आहे. मात्र त्यांचा खोटेपणा उघड झाला आहे. वेदांता फाक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवण्यात आला. तो महाराष्ट्रात सुरू करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी झाली होती. पण या गद्दारांमुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. त्यापाठोपाठ रायगडचा ड्रग बल्क प्रकल्पही गेला. मी एअर बस प्रकल्पाचा उल्लेख करेपर्यंत यांना त्याबाबत काही माहिती नव्हती. यावरून एवढेच म्हणेन की, जित के हारनेवालों को खोके सरकारह्ण कहते हैं.
सध्याचे राज्य सरकार निष्क्रिय असल्याची टीका करून आदित्य ठाकरे म्हणाले की, आज महाराष्ट्रासमोर अनेक गंभीर प्रश्न आहेत. ओला दुष्काळ जाहीर करायला सरकार तयार नाही. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील अंतर्गत कामे थांबली आहेत. निर्णय घेणार कोण, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. काही मंत्र्यांनी अजून पदाचा कार्यभार स्वीकारलेला नाही. केवळ मंत्रीपदाचा मुकुट घालून फिरत आहेत. असे हे खोके सरकारमधील आमदार गणेशोत्सव मिरवणुकीत बंदुकीचा धाक दाखवत आहेत. अधिकाऱ्यांना, पोलिसांना मारहाण केली जाते. गणेशोत्सव काळात मुख्यमंत्री अडीचशे मंडळे फिरले. आता नवरात्रात पुन्हा त्यांना चारशे दांडिया फिरायचे असेल. मात्र, त्याआधी त्यांनी राज्यातील प्रकल्पांकडे लक्ष द्यावे, अशा उपरोधिक शब्दांत आदित्य यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.
रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योगमंत्री सामंत यांच्यासह खेड-दापोलीचे आमदार योगेश कदम आणि चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण हे शिवसेनेचे माजी नेते शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे आदित्य यांनी भाषणात गद्दारह्ण आणि खोके सरकारह्ण या दोन विशेषणांचा वारंवार उल्लेख केला. तसेच उपस्थित जनसमुदायाला आमदार, की गद्दारह्ण असे विचारून गद्दारह्णचा उद्घोष केला. या ४० गद्दारांनी आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवावी. मीही माझ्या आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवतो, असे खुले आव्हानही आदित्य यांनी या संदर्भात बोलताना दिले.
यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते, आमदार तथा शिवसेना नेते भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, संपर्क प्रमुख सुधीर मोरे, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा प्रमुख विलास चाळके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, तालुका प्रमुख बंडय़ा साळवी, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, तालुका युवा अधिकारी प्रसाद सावंत इत्यादी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह
झेडह्ण दर्जाची सुरक्षा असलेल्या आदित्य ठाकरे यांच्यासाठी राज्याच्या गृह विभागाने सुरक्षा रक्षक दिले. पण त्यांना गाडय़ा दिलेल्या नाहीत, अशी तक्रार आहे. याबाबत पत्रकारांनी छेडले असता, माझ्या सुरक्षेसाठी किती रक्षक द्यायचे, त्यांना गाडय़ा द्यायच्या की नाही, हा प्रश्न पूर्णपणे सरकारचा आहे. त्यांची ती जबाबदारी आहे. माझ्यासोबत शिवसैनिक आहेत. त्यांच्याच भरवशावर हा दौरा करतोय, अशी टिप्पणी आदित्य यांनी केली.