मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांच्यावर आज ईडीनं मोठी कारवाई केली. श्रीधर पाटणकर यांच्याशी संबंधित श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीच्या ठाण्यातील एकूण ११ सदनिका ईडीनं जप्त केल्या आहेत. एकूण जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची किंमत अंदाजे ६ कोटी ४५ लाख रुपये असल्याची माहिती मिळत आहे. या कारवाईनंतर राज्यात खळबळ उडाली असून आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात एका ओळीत प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई; जितेंद्र आव्हाड म्हणतात, “त्यात काहीही गैर नाही…”
“मी दिवसभर सदनात होतो त्यामुळे या ईडीच्या कारवाईबद्दल कोणतीही माहिती नाही. नेमकं काय घडलंय, यासंदर्भात सविस्तर माहिती घेऊन नंतर बोलेन. महाविकास आघाडीतील नेते आणि त्यांच्या निकटवर्तीय यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई केली जात आहे का?, असं विचारलं असता तुम्ही जी माहिती देत आहात, त्यावरून ते जाणीपूर्वक केलं जातंय हे समजून जा,” असं आदित्य ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले.
जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया –
ईडी कारवाईच्या माध्यमातून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करणं हे सुडाचं, द्वेषाचं आणि असुयेचं राजकारण वाटतं. विरोधक म्हणून सत्ताधाऱ्यांना अस्थिर करणं हे त्यांचं काम आहे, त्यात काही गैर नाही. पण अशा पद्धतीनं कारवाई करणं चुकीचं असल्याचं मत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं.