उद्धव ठाकरे यांचा इगो दुखावल्यामुळे त्यांनी मेट्रो तीनच्या कामाला स्थिगिती दिली, असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना केला होता. त्यांच्या या आरोपानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, या आरोपाला आता शिवसेनेचे ( उद्धव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आदित्य ठाकरे यांनी शनिवारी रात्री उशीरा माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाबाबतही विचारण्यात आलं, यासंदर्भात बोलताना, देवेंद्र फडणवीस यांनी जनतेची दिशाभूल करण्यासाठी अशाप्रकारचे आरोप केले असतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – Aditya Thackeray : “परवानग्या नाहीत, कंत्राटदारही नाही, तरी भूमिपूजन करणार?” आदित्य ठाकरेंचा मोदींच्या ठाण्यातील कार्यक्रमांवर आक्षेप

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?

“देवेंद्र फडणवीस यांना एकतर चुकीची माहिती मिळाली असेल किंवा त्यांना जनतेची दिशाभूल करायची असेल. कारण महाविकास आघाडीच्या काळात मेट्रो तीनचं काम एक दिवसही थांबलं नव्हतं. पण आम्ही आरे कारशेड हलवली होती. कारण आम्हाला जंगल नष्ट करायचं नव्हतं. मात्र, त्यांना आता पुन्हा जंगल नष्ट करायचं असून त्यांना कांजूरमार्गची जागा अडाणी यांच्या घशात घालायची आहे. आता ही जागा त्यांनी अडाणी यांना दिली आहे”, असं प्रत्युत्तर आदित्य ठाकरे यांनी दिलं. तसेच “लाडकी बहीण योजनेचे पोस्टर बघितलं तर इगो कुणाला दुखावतोय, हे कळेल”, असा टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

दावोसमधील थकीत बीलाच्या मुद्द्यावरूनही शिंदे सरकारला केलं लक्ष्य

पुढे बोलताना स्वित्झर्लंडमधील कंपनीने १.५८ कोटींची उधारी चुकविण्यासाठी राज्य सरकारच्या विभागाला कायदेशीर नोटीस पाठवली होती. यावरूनही आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारला लक्ष्य केलं.“दावोस दौऱ्यादरम्यान मिंधे गटाने २८ तासांत ४० कोटी रुपये खर्च केले. हे पैसे कुठं खर्च झाले, हे त्यांचा विचारायला पाहिजे. पण जागतिक दर्जाची ही लाज आहे. त्यांनी निर्लज्यपणा तर दाखवलाच आहे. दीड कोटीचं बील बाकी असताना बाकीचा पैसा कसा खर्च केला, हे मिंधे गटाने सांगितले पाहिजे. मुळात दावोसमधील दोन्ही दौरे बर्फात जाऊन मजा करण्यासाठी होते. तिथून एकही रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली नाही”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

हेही वाचा – Aaditya Thackeray : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा १० जागांवर विजय, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “इथूनच विजयाचा…”

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?

शनिवारी ठाणे येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष केलं होतं. “कोणाच्या तरी गर्वाचे हरण करणारी मेट्रो थ्री आहे. या मेट्रोला महाविकास आघाडीने रोखले. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की ही मेट्रो ग्रीन एनर्जीला चालना देणारी आहे. तरीही उद्धव ठाकरे यांचा कोणता इगो दुखावला माहिती नाही, त्यांनी या मेट्रोच्या कामाला स्थिगिती दिली”, असा आरोप त्यांनी केला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray replied devendra fadnavis over uddhav thackeray metro three work spb