फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्कनंतर आता टाटा एअरबसचा मालवाहू विमान बांधणी करणारा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. २२ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचं ३० ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान, यावरून राज्यात राजकारण तापले आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर टाटा एअरबसचा एमओयू महाविकास आघाडी सरकार असताना झाला होता, असे स्पष्टीकरण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. दरम्यान, उदय सामंत यांच्या स्पष्टीकरणानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
“कदाचित वेदान्त फॉक्सकॉनप्रमाणेच या प्रकल्पचाहीही उद्योग मंत्र्यांना माहिती नसावी. असा एमओयू जर झाला होता, तर काहीही करून एअरबसचा प्रकल्प राज्यात आणू, असे उद्योग मंत्र्यांनी का सांगितले होते? त्यांनी राज्यातील युवकांची फसवणूक का केली? का ते खोटं बोलले? इतके महिने ते शांत का होते? याची उत्तरं मिळायला हवी”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.
हेही वाचा – ‘टाटा एयरबस’ प्रकल्पावरून होणाऱ्या टीकेला मंत्री उदय सामंतांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “विरोधात असताना…”
“उदय सामंत यांनी यापूर्वीही मंत्रीपदावर काम केलं आहे. आज पुन्हा गद्दार सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहे. प्रत्येक मंत्र्याला हे माहिती आहे, की एकदा एखाद्या कंपनीचा संबंधित राज्याशी करार झाला असेल तर तो बदलता येत नाही. मग तुम्ही कोणत्या आधारावर सांगत होते, की एअर बसचा प्रकल्प महाराष्ट्रात येईल?” असा प्रश्नही त्यांनी उदय सामंत यांना विचारला.
”महाविकास आघाडी सरकार असताना केंद्राबरोबर चांगले संबंध होते. ८० हजार कोटींची गुंतवणूक महाविकास आघाडी सरकाराने केली होती. आता तर केंद्रात आणि राज्यात त्यांचेच सरकार आहे. मग प्रकल्प राज्यातून का जात आहेत? राज्यातील गुंतवणूक कायम रहावी यासाठी माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सुलभ परवानगी देण्यासाठी समिती स्थापन केली होती. गेल्या तीन महिन्यात या समितचीची एकही बैठक झालेली नाही. खोके सरकारवर कोणाचा विश्वास नाही. त्यामुळे राज्यातील गुंतवणूक अन्य राज्यात जात आहे”, अशी टीकाही त्यांनी शिंदे सरकारवर केली.
हेही वाचा – “आदित्य ठाकरे यांचा बाप…” अब्दुल सत्तारांच्या ‘छोटा पप्पू’ टोल्यावरुन सुनील राऊतांचा हल्लाबोल
दरम्यान, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. “इतर राज्याचे मुख्यंमंत्री त्यांच्या राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी फिरत असतात. मात्र, आपले मुख्यमंत्री मंडळं, दहिहंडी, राजकीय फोडाफोडी, राजकीय भेटी सोडून कुठंही जात नाहीत. शिवराज सिंह चौहान असतील किंवा नवीन पटनायक असतील हे मुख्यमंत्री जसे दुसऱ्या राज्यात जातात, तसे आपले मुख्यमंत्री तीन महिन्यात एकतरी राज्यात गेले आहेत का?” असे ते म्हणाले. तसेच “वेदान्त फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज आणि मेडिकल डीव्हाईस प्रकल्पानंतर राज्यात होणारा चौथा मोठा प्रकल्प राज्यातून निघून गेल्याचे दुख: वाटते आहे”, असेही ते म्हणाले.