मुंबईत आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. गेल्या महिन्याभरात राज्यात अनेक ठिकाणी मविआच्या वज्रमूठ सभा झाल्या आहेत. या सभांना जोरदार प्रतिसादही मिळाला. दरम्यान, आता मुंबईतल्या सभेची जोरदार तयारी सुरू आहे. ही वज्रमूठ सभा मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलात आयोजित केली असून यावर आत्तापासूनच भाजपाकडून टीका सुरू झाली आहे. शिवाजी पार्कसारखं मोठं मैदान न घेता छोट्या मैदानाची केल्यावरून सत्ताधाऱ्यांकडून टीका सुरू आहे.
वांद्रे कुर्ला संकुलातील नरे पार्कमध्ये आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेत ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत बोलणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तर काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व भाई जगताप भाषण करतील असं सांगण्यात आलं आहे.
मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीका करणारं एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, जे मैदान ग्राहकोपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनालाही कमी पडतं, जिथे एकट्या भाजपाची सभा असते तेव्हा व्यवस्थेला जे मैदान वापरावं लागतं, अशा बीकेसीतील सर्वात छोट्यातील छोट्या मैदानात तीन पक्षांची सभा होत आहे. ही वज्रमुठ? मैदान छोटे, आकडे खोटे आणि राऊतांसारखे भोंगे फक्त मोठे! शिवाजी पार्क सोडले, बीकेसीतील मोठी मैदानं घेणं टाळलं. उबाठाचा प्रवास “ईश्वरनिष्ठांकडून कम्युनिस्टांकडे” असल्याने भविष्यात नरे पार्कातच सभा होतील असं वाटतंय!
हे ही वाचा >> चॅटरूम ते पाकिस्तान: प्रेयसी फातिमाला भेटायला पुण्यातील विद्यार्थी गेला थेट कराचीत, मात्र होता ‘आयएसआय’चा कट
दरम्यान, आशिष शेलारांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, आशिष शेलार यांना प्रेमाची गरज आहे. त्यांना उत्तर देण्याच्या फंदात मी पडत नाही. ते जी टीका करतात त्याचा मला राग येत नाही. त्यांना प्रेमाची आणि काळजी घेण्याची गरज आहे, आम्ही ते करतो.