तब्बल ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर पक्षबांधणीसाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेला सुरुवात केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून ते शिवसेनेच्या शाखा तसेच बंडखोर आमदारांच्या मतदारसंघांना भेट देत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना पक्ष आता संपला आहे. बाकीचे आमदारदेखील बंड करतील, असा दावा विरोधकांकडून केला जातोय. विरोधकांच्या याच दाव्याला आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. ज्याचं रक्त भगवं आहे, ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. ते मुंबईत बोलत होते.
हेही वाचा >>>> संजय राऊतांविरोधात अटक वॉरंट निघताच नारायण राणेंची टीका, म्हणाले “ते काय…”
“आम्ही सगळीकडे फिरत आहोत. लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद शिवसेना तसेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. ज्यांना त्यांच्यासोबत जायचे आहे, ते जातील. पण मूळ नागरिक आहे, जो शिवसैनिक आहे. ज्यांचे रक्त भगवे आहे; ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.
हेही वाचा >>>> एकनाथ शिंदेंच्या बंडाबद्दल विचारताच नारायण राणेंचे मिश्किल भाष्य, म्हणाले, ‘….मी ज्योतिषी’
तसेच, ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला त्यांनी आम्हाला धोका दिला. कदाचित आमच्याकडून राजकारण कमी झाले असेल. समाजकारणात मात्र आम्ही कोठेही कमी पडलो नाही. ज्यांना परत शिवसेनेत यायचं असेल, त्यांना दरवाजे खुले आहेत. पण ज्यांना वाटतंय की तिकडे त्यांचं भलं होईल तर तिथेच थांबावं. ज्यांना दुसऱ्या पक्षात जायचं असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीसाठी लोकांसमोर यावं. जनता जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
हेही वाचा >>>> “म्हणून एखाद्याच्या वाईट काळात कधीच…”; शिल्लकसेना म्हणत मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला
दरम्यान, आदित्य ठाकरे यांची सध्या निष्ठा यात्रा सुरु आहे. या यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेला सावरण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. ते शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मतदारासंघात जाऊन तेथील शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. या यात्रेची मुंबईतील भायखळा येथून सुरुवात झाली.