Aditya Thackeray : १७ मार्चला नागपूरमध्ये दंगल झाली. औरंगजेबाची कबर खुलताबाद या ठिकाणाहून हटवली पाहिजे अशी मागणी करत काही हिंदू संघटनांनी प्रतीकात्मक पुतळा जाळून आंदोलन केलं. त्यानंतर दोन गटांमध्ये दंगल झाल्याचं पाहण्यास मिळालं. यामध्ये पोलीसही जखमी झाले. यावरुन आता आदित्य ठाकरेंनी एक वक्तव्य केलं आहे.

नागपूरमध्ये १७ मार्चला काय घडलं?

नागपूरच्या महालमधील झेंडा चौकात दोन गटांत झालेल्या संघर्षानंतर १७ मार्चला मोठी जाळपोळ आणि गाड्यांची तोडफोड झाली होती. यावेळी जमावाला पांगवताना एका गटातील लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात पोलिसांनीही त्या गटावर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवला. दरम्यान या घटनेत काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत काय सांगितलं?

दरम्यान १८ मार्चला विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर हिंसाचार प्रकरणी निवेदन देले आहे. ते म्हणाले, “ १७ मार्च रोजी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटवावी असे नारे दिले. यावेळी त्यांनी औरंगजेबाची प्रतीकात्मक कबर जाळली. यानंतर गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर विविध कलमांतर्गत दुपारी गुन्हे दाखल केले.”

नेमकी काय अफवा पसरली होती?

यानंतर संध्याकाळी, सकाळी जाळलेल्या प्रतीकात्मक कबरीवरील कापडावर धार्मिक मजकूर होता अशी अफवा परवण्यात आली. त्यानंतर चितार ओळमधील नमाज आटोपून २०० ते २५० लोकांच्या जमावाने घोषणाबाजी सुरू केली. याच लोकांनी आग लावून टाकू असे हिंसक बोलणे केल्याने पोलिसांनी त्याठिकाणी बळाचा वापर केला.” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. दरम्यान ही दंगल सरकारमधल्याच काही घटकांनी घडवून आणली का? असा सवाल आता आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

आदित्य ठाकरेंनी नेमका काय मुद्दा उपस्थित केला?

नागपूरमध्ये जी दंगल झाली आहे त्यामागे कोण आहे? याचा आम्ही विचार करत आहोत. याच सरकारमध्ये असे काही घटक आहेत का? ज्यांना मुख्यमंत्री हे गृहमंत्री म्हणून अपयशी आहेत असं दाखवायचं आहे? या सगळ्याच्या मुळाशी कोण आहे? याचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करायला पाहिजे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात त्यांच्याच सरकारमधले काही घटक काम करत आहेत का? हा विचार त्यांनी केला पाहिजे या आशयाचं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं. आता आदित्य ठाकरे यांचा अंगुलीनिर्देश नेमका कुणाकडे आहे? याची चर्चा सुरु झाली आहे.

Story img Loader