सर्व धर्मांचा आदर राखण्याचे संस्कार बाळासाहेब ठाकरे यांनी केल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले. ते आज औरंगाबाद शहरात आले होते. स्मार्ट सिटी याेजनेंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या आैरंगाबाद शहर वाहतूक बस सेवेचे लाेकार्पण युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी क्रांती चाैकातून करण्यात आले. यानंतर उदघाटनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेचे, भाजपचे नेते एकाच व्यासपीठावर दिसून आले. या कार्यक्रमात दाेन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्मार्ट सिटी याेजनेत आैरंगाबादचा समावेश झाल्याचे श्रेय लाटताना दिसून आले.
इम्तियाज जलील यांनी आदित्य ठाकरे यांचे काैतुक करीत विकासाबाबतचे जाहीर पत्र त्यांच्या हाती साेपवले. आदित्य हे विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व असल्याचे जलील म्हणाले. तर आदित्य ठाकरे यांनी आैरंगाबादकरांचे आभार मानत यापुढेही विकास कामासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचे सांगितले. सर्व धर्मांबाबत आदर राखण्याचे संस्कार आजाेबा बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्यावर केल्याचे सांगितले. प्रत्येक शहरासाठी शिक्षण, आराेग्य, पर्यावरण व परिवहन या चार महत्त्वाच्या गाेष्टी असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. अध्यक्षीय समाराेपात हरिभाऊ बागडे यांनी आपल्यावर पैसे खाल्ल्याच्या खासदार खैरे यांनी केलेल्या आराेपाचे खंडण करून शहराच्या विविध विकास याेजनांसाठी आपलाही पाठपुरावा आणि प्रयत्न असल्याचे सांगितले.
आदित्य ठाकरे यांनीही त्यात आपलेही काही श्रेय असल्याचा उल्लेख केला.
क्रांती चाैकात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हाेते. व्यासपीठावर महापाैर नंदकुमार घाेडेले, खासदार चंद्रकांत खैरे, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, भाजपचे आमदार अतुल सावे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, विनाेद घाेसाळकर, डाॅ. भागवत कराड, उपमहापाैर विजय आैताडे, मनपाचे आयुक्त डाॅ. निपुण विनायक, राजू वैद्य, विकास जैन, राजेंद्र जंजाळ, प्रमाेद राठाेड, प्रशांत देसरडा आदी नेते उपस्थित हाेते.
आैरंगाबाद शहराचा स्मार्ट सिटी याेजनेंतर्गत समावेश करण्यावरून भाजप व सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. भाजपचे आमदार अतुल सावे यांनी केवळ चंद्रकांत खैरे यांनीच नाही तर आपल्यासह मुख्यमंत्री, हरिभाऊ बागडे, रावसाहेब दानवे यांनीही प्रयत्न केल्याचे सांगितले. तर खासदार खैरे यांनी आपणच कसे स्मार्ट सिटीमध्ये शहर आणण्यासाठी प्रयत्न केले, हे ठासून सांगितले. खा. खैरे यांनी, त्यासाठी दिल्लीत दमछाक केल्याचे अतुल सावे यांच्याकडे पाहात सांगितले.