जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात झालेल्या सत्तानट्यामुळे सत्तांतर झाल्याचं पहायला मिळालं. महाविकास आघाडीमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्याच्या रात्रीच बंडखोरी करुन सुरतला निघून गेले. १२ आमदारांसहीत शिंदे सुरतला गेल्याची बातमी ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून झळकली अन् राज्यात राजकीय भूकंप होणार याची पहिली चाहूल लागली. त्यानंतर अपात्रतेसंदर्भातील आदेश, या आमदारांची समजूत काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पाठवलेली नेते मंडळी, नाराजी नाट्य, गुवहाटी प्रकरण आणि आठवडाभराच्या आरोप प्रत्यारोपानंतर बंडखोर गटात ४० शिवसेना आमदार आणि १० अपक्ष आमदार सहभागी झाल्याने अल्पमतात आलेलं ठाकरे सरकार पडलं.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंसंदर्भातील ‘ती’ एक चूक शिवसेनेला महागात पडली; आदित्य ठाकरेंचं रोखठोक मत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२९ जून रोजी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला अन् दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी एकनाथ शिंदेंनी भारतीय जनता पार्टीच्या समर्थनाच्या आधारे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र या सर्व सत्तानाट्यादरम्यान उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या समर्थनासाठी जाणाऱ्या आमदारांना का नाही थांबवलं असा प्रश्न अनेकदा चर्चेत आला. याच प्रश्नाला उद्धव याचे पुत्र आणि युवासेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.

नक्की वाचा >> “गद्दारांचे नेते काहीतरी करण्याच्या मार्गावर असल्याचं कानावर होतं पण एवढं…”; शिंदेंच्या बंडखोरीबद्दल आदित्य ठाकरेंचं विधान

आदित्य ठाकरेंनी आम्ही शिंदेंवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याची चूक केली असं विधान ‘मटा कॅफे’च्या कार्यक्रमामध्ये केलं. याचसंदर्भात बोलताना त्यांनी बंडखोरांना न रोखण्याच्या निर्णयामध्ये उद्धव ठाकरेंनी नेमकं काय कारण दिलं हे सुद्धा सांगितलं. “१२ लोक गेले तेव्हा मला उद्धवसाहेबांनी सांगितलं की, आदित्य यांच्यामागे आपण पोलीस वगैरे लावून काही उपयोग नाही. स्वत:ला विकेलेले हे लोक आज नाहीतर उद्या निघून जाणार आहेत. ते पैशाला विकले गेलेले आहेत,” असं आदित्य ठाकरेंनी या मुलाखतीत म्हटलं.

नक्की वाचा >> ठाकरेंची मतदानाला दांडी! पवार-शेलार गटातून निवडून आल्यानंतर मिलिंद नार्वेकर स्पष्टच बोलले, “ते नाही आले तरी हरकत नाही, उमेदवारी…”

तसेच उद्धव ठाकरेंनी आपल्याला, “आता काय यांच्यामागे लागून करायचं? यांच्यावर काही दडपण असेल. त्यांनी काही गैर केलं असेल अथवा लोकांबरोबर काही चुकीचं केलं असेल याचं दडपण असेल तर निघून जाणार आहेत. स्वत:ला विकलं असेल तर निघून जाणार आहेत. यांना किती दिवस रोखायचं आणि का म्हणून रोखायचं? आपण काही चुकीचं केलेलं नाही आपण जनतेसमोर जाऊ. आपण जनतेमध्येच आहोत. आपला चेहरा लोकांना ठाऊक आहे,” असंही सांगितल्याचं आदित्य म्हणाले.

नक्की वाचा >> ‘मी, फडणवीस, पवार एकत्र असल्यानं काही जणांची…”; पवार अन् फडणवीसांच्या मध्ये उभं राहून भाषण देताना CM शिंदेंचा ठाकरेंना टोला

तसेच शिंदे गटातील आमदारांना टोला लगावताना आदित्य यांनी, “हे मुखवटे लावून फिरत होते आणि अजून मुखवटे लावून फिरतायत. अनेक वेगवेगळी कारणं देतात. हिंदुत्वापासून, काँग्रेस, राष्ट्रवादीपासून निधीपासून सगळी कारणं देत असतात. ते पळून गेले आहेत. आम्ही इथेच आहोत. आता बघू,” असंही म्हटलं.

नक्की वाचा >> “माझे सासरे शिंदे होते, जावयाच्या ज्या काही…”; CM शिंदेंच्या बाजूला बसून पवारांचं विधान; फडणवीस भन्नाट उत्तर देत म्हणाले, “सासरच्या माणसांना…”

तसेच या बंडखोरीनंतर आमच्या मनामध्ये भीती नसल्याचं सांगताना यामागील कारणही आदित्य यांनी सांगितलं. “आम्हाला भीती एवढ्यासाठी नाहीय कारण आजपर्यंत शिवसेनेशी ज्यांनी ज्यांनी गद्दारी केलेली आहे ते आज कुठे आहेत आणि शिवसेना कुठे आहे हे देखील समोर आहे,” असं आदित्य म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray says father ex cm uddhav thackeray said no use of forcing eknath shinde and rebel mla to stay in shivsena scsg