वरळीचे (मुंबई) आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रविवारी (४ डिसेंबर) मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी मुंबईतल्या महालक्ष्मी येथील रेसकोर्स प्रकल्प आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून राज्य सरकारला धारेवर धरलं. आदित्य ठाकरे म्हणाले, दिघा रेल्वे स्थानक, अटल सेतू प्रकल्प उभारून पूर्ण झाले होते, मात्र उद्घाटनासाठी सरकारला मुहूर्त नव्हता. दुसऱ्या बाजूला कोस्टल रोडचं काम पूर्ण देखील झालेलं नाही. तरी केवळ निडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन उद्घाटनाचा घाट घातला जातोय. कोस्टल रोडचं काम आमचं आहे, उध्दव ठाकरे यांचं ते स्वप्न होतं. दर महिन्याला आम्ही भेटी द्यायचो. आमचं सरकार असतं तर सगळी कामं आम्ही वेळेत पूर्ण केली असती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महालक्ष्मी रेसकोर्सच्या जमिनीवर होणाऱ्या प्रकल्पावरूनही आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्र्यांचं बिल्डरांबरोबर साटंलोटं सुरू होतं. तबेले बांधले जाणार आहेत. पण घोडे हे सुटाबुटतील लोकांचे आहेत. त्यांना तबेले बांधून दिले जाणार आहेत. पण जनतेचे पैसे त्यासाठी का वापरले जातायत? लाच देणं सुरू होतं. आत्ता सेंट्रल पार्कचा घाट घातला जातोय. कोणत्या बिल्डरसाठी हे चालू आहे? सेलिब्रेटींना ट्विट करायला लावलं. पण प्रकल्प उभारताना आजूबाजूच्या कोणत्या SRA मधील लोकांना सामावून घेणार? मोफत एफएसआय मुंबईकरांच्या पैशातून बिल्डरला देणार आहात. म्हणूनच मोठ्या प्रमाणात या पार्कला विरोध होतोय.

आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही काही प्रश्न उपस्थित केल्यानंतर क्लब हाऊस रद्द करण्यात आलं. परंतु, आम्ही बिल्डरांना तिथे कार पार्क प्रकल्प करू देणार नाही. आम्ही मुंबईकरांचा पैसा वाया जाऊ देणार नाही. कारण रेस कोर्सचा वापर हा सामान्य मुंबईकर योगा, मॉर्निंगवॉकसाठी करतील. तसेच इथे १०० कोटी रुपये खर्च करून तबेले बांधून दिले जाणार आहेत. पण IRWTC हे स्वतः देखील ते करू शकत होतं. सेंट्रल पार्क होणार त्याबद्दल मुख्यमंत्री आणि प्रशासक खोटं बोलत आहेत. IRWITC ला मुलुंड येथील जागा घ्यायला लावणार होते. वेलिंग्टन क्लब आणि इतरही क्लबची लिझ संपलेली आहे. आम्ही तिथे लॅण्डस्केप मैदान करायला सांगणार होतो. पण प्रशासक सतत त्यांची भूमिका बदलत आहेत.

महाराष्ट्रात गँगवॉर सुरू आहे आणि एकनाथ शिंदे गँग लीडर

या पत्रकार परिषदेतून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीकेचे बाण सोडले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवताना आदित्य ठाकरे यांनी गणपत गायकवाड (भाजपा आमदार) यांनी केलेल्या गोळीबाराच्या प्रकरणाचा उल्लेख करत राज्यातील अराजकता मांडली. आदित्य ठाकरे म्हणाले, कॅबिनेट बैठकीत कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे का? सरकारमधील आमदार गणपती मिरवणुकीत पिस्तूल काढतात, पोलीस ठाण्यात गोळीबार करतात. याच आमदारांना सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्ष केलं जातं. यांचे अधिकारी महिलेवर गाडी चालवतात, आमदाराचा मुलगा अपहरण करतो हे सगळं सीसीटीव्हीत कैद होतंय. यांच्यावर UAPA कायद्याने कारवाई व्हायला हवी होती. या प्रकरणांमध्ये भाजपाची काय भूमिका आहे ते त्यांनी सांगावं. महाराष्ट्रात गँगवॉर सुरू आहे आणि एकनाथ शिंदे त्यापैकी एका गँगचे लीडर आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray says gangwar going on in maharashtra eknath shinde gang leader asc
Show comments