आमदार तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे ‘महानिष्ठा, महान्याय, महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत राज्यातल्या जनतेशी संपर्क साधत आहेत. आज मुंबईच्या लालबाग येथील विभाग क्रमांक ११ येथे त्यांनी स्थानिकांना संबोधित केलं. लालबाग येथे आयोजित ठाकरे गटाच्या सभेला संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले, सध्याचं सरकार केवळ इतिहासात काय झालं त्यात अडकून पडलं आहे. परंतु, आपण मुंबई आणि महाराष्ट्र आहोत. आपण भविष्यावर काम करणारे लोक आहोत, सध्याचं सरकार राज्यातले उद्योग गुजरातला पाठवतंय. यांच्या फक्त घोषणा बदलत असतात, परिस्थिती तीच राहते. ‘अब की बार ४०० पार’ वगैरे घोषणा ते देत असतात. निवडणुका आल्या की घोषणा बदलतात, कामं मात्र होत नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदित्य ठाकरे म्हणाले, ‘गद्दारांनी कितीही रडारड केली तरी त्यांच्यावर असलेला ‘गद्दार’ आणि ‘बापचोर’ हा शिक्का कधीच पुसला जाणार नाही. प्रकल्प गुजरातेत पळवतायत, मुंबईच्या रक्तात क्रिकेट असताना वर्ल्डकप फायनल कुठे झाली तर गुजरातला. तो सामना मुंबईत झाला असता तर सामन्याचा निकाल वेगळा असता. त्यांचं (भाजपा) महाराष्ट्राच्या विकासाशी देणं घेणं नाही. सगळं गुजरातला पाठवलं जातंय, आपण याला आमदार बनवू, त्याला खासदार बनवू, अशा चर्चा चालू आहेत. परंतु, तरुणांचं काय, त्यांच्या रोजगाराचं काय?

वरळीचे आमदार म्हणाले, देशभरात आणि राज्यभरात सरकारकडून शिवसैनिकांवर केंद्रीय संस्थांकरवी दबाव आणला जातोय. या गद्दारांच्या विरोधात माजी महापौर किशोरी पेडणेकर, राजन साळवी, सूरज चव्हाण लढत आहेत. संजय राऊत तर तुरुंगात जाऊन आले. आता तर ते कोणालाच घाबरत नाहीत. त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्रीय संस्थांचा वापर केला जातोय. उद्या तुमच्या घरीसुद्धा ईडी, सीबीआयवाले येतील. परंतु, तुम्ही घाबरायचं नाही. आपण एक होऊन मुंबईकर म्हणून लढायचं आहे.

हे ही वाचा >> “…तरच अजित पवारांची लोकसभेला मदत करू”, भाजपाचा इशारा; म्हणाले, “तीन वेळा पाठीत खंजीर…”

आदित्य ठाकरे म्हणाले, मला भाजपाच्या कार्यकर्त्यांविषयी वाईट वाटतंय. कारण आता ज्या काही नेत्यांना पदं दिली आहेत. त्यातले बहुतेकजण बाहेरचे आहेत. मी तर राहुल गांधी यांना सल्ला देईन की तुम्हाला पंतप्रधान बनायचं असेल तर, तुम्ही भाजपात जा. कारण तिथे सर्व काँग्रेसवालेच आहेत. आता भाजपाचा नारा बदलला आहे ‘दाग अच्छे है’, ‘वाशिंग पावडर भाजपा’ असे त्यांचे नारे आहेत. कारण जेवढे गद्दार आणि भ्रष्टाचारी आहेत, ते सर्व भाजापमध्ये आहेत.