भरतीय जनता पार्टीचे नेते आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत असताना ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मुनगंटीवार म्हणाले की, राज्य सरकारविरोधात जनमत आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर वरळी विधानसभेचा राजीनामा द्या. तिथे निवडणूक घेऊ, असं आवाहन मुनगंटीवार यांनी दिलं होतं. या आव्हानाला आता आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.
मुनगंटीवार म्हणाले होते की, पोपट मेलेला आहे. शिल्लक आमदारांना राजीनामा द्यायला सांगा. तुम्ही देखील (आदित्य ठाकरे) वरळी विधानसभेचा राजीनामा द्या. त्याठिकाणी टेस्ट घेऊ. यावर आता आदित्य ठाकरे यांनी देखील उत्तर दिलं आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्री वरळीतून लढणार असतील तर मी राजीनामा देईन, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरे म्हणाले की, “ठिक आहे! ते (भाजपा) जर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माझ्यासमोर उभं करत असतील तर आत्ता राजीनामा देतो. चला, माझी तयारी आहे.” असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिलं आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, मुळात मुनगंटीवार यांचंही कोण या सरकारमध्ये ऐकत नाही अशी परिस्थिती आहे.
हे ही वाचा >> “…आता दोन हजारांची नोट बंद, याला काय अर्थ?” मोदी सरकारच्या निर्णयावर अजित पवारांची टीका
दरम्यान, यावेळी आदित्य ठाकरे यांनी २ हजार रुपयांचा चलनी नोटा वितरणातून काढण्याच्या सरकारच्या निर्णयावरदेखील भाष्य केलं. आदित्य ठाकरे म्हणाले, आरबीआयने २ हजारच्या नोटा बंद केल्या आहेत, याकडे तुम्ही कशादृष्टीने पाहता, असा प्रश्न पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना विचारला. त्यावर ते म्हणाले की, नोटबंदीमुळे देशाच्या आर्थिक स्थितीवर काय परिणाम होईल यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांत आरबीआयने सतत पुढे मागे पुढे मागे केलं आहे. त्यामुळे त्यावर स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे.