ही नुसती गद्दारी नाही झाली तर त्यांनी प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असं म्हणत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदार, खासदारांना गुरुवारी लक्ष्य केलं. मानखुर्द येथे झालेल्या निष्ठा यात्रेदरम्यान बोलताना आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवरही टीका केल्याचं पहायला मिळालं.

आमचं काय चुकलं की यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला? असा प्रश्न आदित्य यांनी आपल्या भाषणामध्ये उपस्थित केला. तसेच माझ्या मनात राग नाही आणि कोणत्याच शिवसैनिकांच्या मनातही पक्ष सोडून गेलेल्यांबद्दल राग नाही. मात्र ज्या माणसाने यांना राजकीय ओळख दिली त्यांच्या पाठीत यांनी खंजीर खुपसाला याचं दुःख आहे, असंही आदित्य यांनी आपल्या भाषणात म्हटलं. राज्यामध्ये हे ४० लोक कुठेही फिरले तरी गद्दार म्हणूनच फिरणार असा टोलाही आदित्य यांनी लगावला. यापैकी कोणाचीही राजीनामा देण्याची हिम्मत नाही. हे गद्दार आहेत आणि हे ४० लोक गद्दार म्हणूनच महाराष्ट्रात फिरणार, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

पाहा व्हिडीओ –

राज्यामधील रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावरुन टोला लगावताना आदित्य यांनी, “दोन लोकांचं जम्बो कॅबिनेट आपल्या महाराष्ट्रात आहे,” असं म्हटलं. तसेच कायदेशीर लढाईबाबतीत भाष्य करताना, कायद्याप्रमाणे शिवसेनेची बाजू मजबूत आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे राक्षसी महत्त्वाकांक्षा घेऊन हे सरकार सत्तेत आलं आहे. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. विधानसभेमध्ये हे ४० गद्दार आरोपींप्रमाणे आले आम्ही १४ जण स्वाभिमानाने सभागृहामध्ये बसलो होतो असंही आदित्य ठाकरे म्हणाले. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्येही ते कशापद्धतीने बसमधून आले आणि गेले हे आपण सर्वांनी पाहिलं, असा टोलाही आदित्य यांनी लगावला.

Story img Loader