महायुतीत जाण्याबाबत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सूचक विधान केलं आहे. जोपर्यंत भाजपाकडून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तोपर्यंत आम्ही भाजपाबरोबर जाऊ शकत नाही, असं ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरे यांनी आज ‘बोल भिडू’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान त्यांना पुन्हा भाजपाबरोबर जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. याप्रश्नाचं उत्तर देताना, “भाजपाला या देशातील लोकशाही संपवायची आहे. जोपर्यंत भाजपाकडून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तोपर्यंत आम्ही भाजपाबरोबर जाऊ शकत नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – राज ठाकरेंबरोबर युती करताना नातं आडवं येतं का? आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले…

“आताची भाजपा विश्वासार्ह नाही”

पुढे बोलताना, “अटल बिहारी वाजपेयी आणि लाल कृष्ण आडवाणी यांची भाजपा आणि आताची भाजपा पूर्णपणे वेगळी आहे. आजच्या भाजपाने प्रकाश मेहता, विनोद तावडे, पुनम महाजन अशा कितीतरी नेत्यांना बाजुला काढलं आहे. खरं तर वाजपेयी, आडवाणी, प्रमोद महाजन यांची भाजपा विश्वासार्ह होती. मात्र, आताची भाजपा विश्वासार्ह नाही. त्यांना सत्ता आल्यानंतर मित्रपक्ष नको आहे. आजच्या भाजपाला देशातील संविधान बदलायचे आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.

“देशात सध्या घाणेरड्याप्रकारचं राजकारण सुरू”

“२०१४ पूर्वीचं राजकारण वेगळं होतं. आताचं राजकारण वेगळं आहे. आज तुम्ही कोणत्या रंगाचे कपडे घालता, ते काय जेवता यावरून राजकारण केलं जाते. आज शाळेत, महाविद्यालयात आणि खेळातही राजकारण पोहोचलं आहे. घाणेरड्याप्रकारचं राजकारण सुरू आहे. एक काळ होता, ज्यावेळी शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे एकमेकांचे राजकीय वैरी होते. दोघांची भूमिका वेगळी होती. मात्र, त्यांचा विरोधात वैयक्तिक कधीच नव्हता”, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray statement on joining nda again know in details spb