राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नवा पक्ष काढला. या पक्षाला आता १८ वर्षे झाली आहेत. या १८ वर्षांत दोन्ही पक्षांतील प्रमुख नेते वगळता इतर सर्वांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच दोन भावांच्या युतीसाठी काही नेत्यांनी प्रयत्नदेखील केले. मात्र, त्यात कोणालाही यश आलं नाही. दरम्यान, या दोन्ही पक्षाच्या एकत्र येण्याच्या मुद्द्यावर आता आदित्य ठाकरेंनी भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरे हे आज एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझे व्हिजन’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध राजकीय विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान त्यांना राज ठाकरेंबरोबर युती करताना नातं आडवं येतं का? असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, “मुळात नातं आडवं येतं ते म्हणजे टीका करताना, त्यामुळे आम्ही कधीही टीका करत नाही किंवा करणारही नाही. नातं असल्यामुळे आम्ही काही बोलत नाही. कारण ते आमच्या घरातील संस्कार आहेत”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.

हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांचा टोला, “उद्धव ठाकरे भ्रमात जगत आहेत, माझं डोकं पूर्णपणे ठिकाणावर आहे..”

मनसेच्या कार्यकर्त्यांना विचारला प्रश्न

पुढे बोलताना बिनशर्त पाठिंब्यावरून त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना प्रश्नही विचारला. “मला मनसेच्या कार्यकर्त्यांना मनापासून विचारायचं आहे की, ज्या भाजपाला मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला, त्या भाजपाने गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राची वाट लावली आहे. जे उद्योग महाराष्ट्राच्या हक्काचे होते, ते त्यांनी गुजरातला पळवले आहेत. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्राचे हक्काचे रोजगार हिरावले आहेत. हे सर्व बिनशर्त पाठिंब्यांचे पॅकेज आहे का? याचं उत्तर त्यांनी द्यावं”, असे ते म्हणाले.

“ज्यांना संविधान वाचवायचं आहे, त्यांनी आमच्याबरोबर यावं”

“इतक्या वर्षांपासून आम्ही राजकारण करतो आहे. मात्र, मनसे असेल किंवा इतर राजकीय पक्ष असतील, त्यांच्यावर आम्ही कधीही वैयक्तिक टीका केली नाही. आम्ही महाविकास आघाडी निर्माण केली, ती देशातील संविधान वाचवण्यासाठी केली आहे. त्यामुळे ज्यांना संविधान वाचवण्यसाठी लढायचं आहे, त्यांनी आमच्याबरोबर यावं. आम्ही कधीही कोणाला बिनशर्त पाठिंबा दिलेला नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान राखला जावा, ही आमची अट होती”, असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा – “मीच उद्धव ठाकरेंच्या मानेवरचा पट्टा…”, एकनाथ शिंदेंचा टोला; आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले…

दरम्यान, दोन पक्ष म्हणजेच शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे भविष्यात एकत्र येतील का? असं विचारलं असता, “जर-तरच्या राजकारणाबाबत बोलण्यात काहीही अर्थ नाही”, असे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray statement on mns shivsena raj uddhav allience spb