शिवसेना पक्षात मोठे बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. तब्बल ४० आमदारांनी ठाकरेंची साथ सोडून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. या मोठ्या बंडानंतर शिवसेनेत उघड उघड दोन गट पाडले आहेत. याच दुफळीमुळे शिवसेना संपणार असा दावा विरोधकांकडून केला जातोय. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी पक्षात नवचौतन्य निर्माण करण्यासाठी कंबर कसली आहे. ते निष्ठा यात्रेच्या माध्यमातून मुंबईतील शिवसेनेच्या शाखांना भेटी देणार असून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या यात्रेच्या माध्यमातून ते बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातही जाणार आहेत. या यात्रेला शुक्रवारपासून (८ जुलै) सुरुवात होणार आहे.
हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंना आणखी मोठा धक्का, ठाण्यानंतर नवी मुंबईतील नगरसेवक शिंदे गटात सामील होणार?
पक्षाला गळती लागलेली असताना आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेची घोषणा केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे मुंबईतील शिवसेनेच्या २३६ शाखांना भेट देणार आहेत. यावेळी ते शिवसेनेतील स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच पक्षविस्तार आणि पक्षबांधणीसाठी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही करणार आहेत. दुसरीकडे चाळीस आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. तसेच ठाणे महानपरपालिकेतील ६६ नगरसेवकही शिंदे गटात सामील झाले आहेत. नवी मुंबईतील ३० ते ३२ नगरसेवकही याच मार्गावर असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेची घोषणा केल्यामुळे सर्वांचे लक्ष या यात्रेकडे लागले आहे.
हेही वाचा >>> औरंगाबादच्या नामांतरावर काँग्रेस हायकमांड नाराज? राज्यातील मोठा नेता म्हणतो ‘विश्वासात घ्यायला हवे होते’
कशी असेल निष्ठा यात्रा ?
आदित्य ठाकरे शिवसेनेच्या २३६ वेगवेगळ्या शाखांना भेटी देणार आहेत. या भेटीदरम्यान ते शाखाप्रमुख, गटप्रमुख तसेच निष्ठावान शिवसैनिकांशी संपर्क साधणार आहेत. या यात्रेच्या माध्यमातून सध्या शिवसेनेमध्ये निर्माण झालेली अस्थितरता मिटवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिवसेनेतील संभाव्य फूट रोखण्याचाही प्रयत्न या निष्ठा यात्रेच्या माध्यमातून केला जाणार आहे. यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे शक्तीप्रदर्शन करणार असून शिवसेना अजूनही आहे तशीच आहे, असा संदेश या यात्रेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.