शिवसेना नेते पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख अखेर निश्चित झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाला आहे. परंतु, आदित्य ठाकरे हे शिवसैनिकांसह अयोध्येत पोहचणार आहेत. मशिदीवरील भोंगे आणि आणि हनुमान चालिसा पठण या काही मुद्य्यांनंतर शिवसेना आणि मनसेमध्ये एकप्रकारे हिंदुत्वावरून रस्सीखेच सुरू झाल्याचे दिसून आले. याच दरम्यान, आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा करण्यात आली होती. सुरुवातीस आदित्य ठाकरेंचा दौरा १० जून रोजी निश्चित झाला होता, मात्र त्यात बदल होऊन आता या दौऱ्याची तारीख १५ जून झाली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख निश्चित केली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते,पदाधिकारी देखील असणार आहेत.
“ जय श्रीराम…१५ जून चलो अयोध्या… आदित्य ठाकरे शेकडो शिवसैनिकांसह अयोध्येला येणार… रामलल्लाचे दर्शन घेणार.” असं संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे.
आदित्य ठाकरे हे अयोध्येला पोहचण्यापूर्वी शिवसेना नेते संजय राऊत, एकनाथ शिंदे तेथील तयारीचा आढावा घेत आहेत. तर, आदित्य ठाकरे यांच्यासोबत युवासेना नेते वरुण सरदेसाई यांच्यासह अन्य नेतेमंडळी व पदाधिकरी असणार आहेत. अशी माहिती संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.