मागील काही महिन्यांमध्ये फॉक्सकॉन वेदान्त, सॅफ्रन, टाटा एअरबस यासारखे मोठे प्रकल्प राज्यातून बाहेर गेले. राज्यात होणारी मोठी आर्थिक गुंतवणूक गुजरात राज्यासह इतर राज्यांत गेल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तर दुसरीकडे परराज्यात गेलेले सर्व प्रकल्प हे महाविकास आघाडी सरकारच्या काळातील असून त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांच्या सत्ताकाळात काहीही काम केलेले नाही, असा दावा सत्ताधारी शिंदे गट-भाजपाकडून केला जात आहे. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप होत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दोन स्वतंत्र पत्रकार परिषदा घेऊन एकमेकांवर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून समोरासमोर चर्चेसाठी यावे, असे थेट आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. याच मुद्द्यावरून त्यांनी ट्विटरवर लोकांचे मत जाणून घेण्यासाठी ते ‘ट्विटर पोल’ पोल घेत आहेत.
हेही वाचा >>> “शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र नाही,” महाविकास आघाडीवर बोलताना नाना पटोलेंचे मोठे विधान, म्हणाले “आम्हाला संभ्रम…”
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला ‘खोटे सरकार’ म्हणत ट्विटरवर पोल घेतला आहे. त्यांनी या पोलमध्ये ‘घटनाबाह्य मुख्यमंत्री ‘वेदन्त फॅाक्सकॅान’ आणि इतर उद्योग महाराष्ट्राबाहेर जाण्याबद्दल माझ्याशी समोरासमोर चर्चा करण्याचे आव्हान स्वीकारतील? तुम्हाला काय वाटतं?’ असे महाराष्ट्रातील जनतेला विचारले आहे. याआधीही पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातून बाहेर गेलेल्या वेदान्त फॉक्सकॉनसह अन्य प्रकल्पांची तपशीलवार माहिती दिली होती. तसेच तारखा आणि बातम्यांचे सदर्भ देत त्यांनी विद्यमान सरकारच्या अनास्थेमुळेच हे प्रकल्प राज्याच्या बाहेर गेल्याचा दावा केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी माझ्यासमोर यावे. तसेच समोरसमोर चर्चा करावी, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले होते.
हेही वाचा >>> भिडे गुरुजींशी तुमचे वैयक्तिक संबंध आहेत का? पत्रकारांनी विचारताच जयंत पाटलांचं स्पष्टीकरण, म्हणाले “मी त्यांना…”
आदित्य ठाकरे यांच्या आव्हानाला भाजपाने जशास तसे उत्तर दिले होते. आदित्य ठाकरे यांच्या वडिलांनी (उद्धव ठाकरे) मुख्यमंत्री असताना एकही पत्रकार परिषद घेतली नाही. ते एकदाही राज्यातील समस्येच्या मुद्द्यावरून जनतेशी बोलले नाहीत. मात्र आता आदित्य ठाकरे समोरासमोर चर्चा करण्याची मागणी करत आहेत. वडील मुख्यमंत्री असताना एक न्याय आणि दुसरे मुख्यमंत्री असतील तर दुसरा न्याय, असे कसे चालेल? असे भाजपाचे नेते आशिष शेलार म्हणाले होते.
हेही वाचा >>> रवी राणांसोबतच्या वादानंतर आता पुढे काय? आगामी निवडणुकीत कोणाशी युती? बच्चू कडू म्हणाले…
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी थेट ट्विटवर पोल घेत मुख्यमंत्री समोरासमोर चर्चेसाठी येणार का, असे विचारल्यामुळे जनता याबाबत काय विचार करते? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.