Aditya Thackeray Vs Gulabrao : महाराष्ट्र सरकारच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सभागृहात आदित्य ठाकरे आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. मंत्र्यांनी अभ्यास करुन सभागृहात उत्तरं दिली पाहिजे असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. ज्यावर गुलाबराव पाटील यांनीही माझा अभ्यास आहे म्हणूनच मला तुमच्या वडिलांनी खातं दिलं होतं असं उत्तर दिलं आहे. या दोघांमध्ये चांगलीच शाब्दिक टोलेबाजी पाहण्यास मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सभागृहात नेमकं काय झालं?

आदित्य ठाकरे म्हणाले “काहीही विचारलं तर मंत्री महोदय लगेच केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. मंत्र्यांना खातं कळलं आहे की नाही हाच प्रश्न आहे.” असं वक्तव्य केलं. त्यावर गुलाबराव पाटील यांनीही आदित्य ठाकरेंना उत्तर दिलं.

गुलाबराव पाटील यांचं उत्तर काय?

मला खातं कळतं, म्हणूनच तुमच्या वडिलांनी मला ते खातं दिलं होतं.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

म्हणून तर तुम्ही पळून गेलात. असं आदित्य ठाकरे म्हणाले.

यानंतर राहुल नार्वेकर काय म्हणाले?

राहुल नार्वेकर यांनी दोघांनाही सांगितलं की वैयक्तिक कमेंट करुन का. मी हे रेकॉर्डवर घेणार नाही. गुलाबराव पाटील आणि आदित्य ठाकरे यांच्यातला हा सामना मात्र उपस्थित असलेल्या प्रत्येकानेच पाहिला.

शिवसेनेत २०२२ ला सर्वात मोठी फूट

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे मोठी फूट पडली. या फुटीनंतर एकनाथ शिंदेंसह चाळीस आमदार गेले होते. त्यावेळी म्हणजेच २०२२ ला या चाळीस आमदारांचा उल्लेख संजय राऊत यांनी चाळीस रेडे असा केला होता. तसंच उद्धव ठाकरे यांनीही या सगळ्यांवर टीका केली होती. मात्र आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेण्यासाठी बंड केलं आणि उठाव केला अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी कायमच घेतली आहे. तर उद्धव ठाकरे हे त्यांचा उल्लेख कायमच मिंधे असा करतात. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपा, महायुतीला २३७ जागा मिळाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी तर ५६ आमदार निवडून आणून दाखवले. शिवसेनेत अशी सगळी दुही आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्या आमदारांमधून विस्तव जात नाही असं चित्र आहे. त्याचाच प्रत्यय आज गुलाबराव पाटील विरुद्ध आदित्य ठाकरे यांच्यातली खडाजंगी पाहताना आला. आदित्य ठाकरे यांनी जेव्हा अध्यक्षांना विनंती केली आणि मंत्र्यांनी अभ्यास करुन यावा म्हटलं तेव्हा गुलाबराव पाटील यांनीही उद्धव ठाकरेंचं नाव घेत आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.