‘वेदान्त-फॉक्सकॉन’, ‘टाटा-एअरबस’, ‘सॅफ्रन’ या तीन आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी राज्य सरकार किंवा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांशी कोणताही सामंजस्य करार केलेला नसल्याने हे प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेले, असे म्हणणे योग्य होणार नाही, असा युक्तिवाद उद्योग विभागाने श्वेतपत्रिकेत केला आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाकर्ता आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांना माहितीशुन्य म्हणत टीका केली होती. त्यावर, उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काल (३ ऑगस्ट) ते प्रसिद्ध माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा >> उद्योगांशी करार झालेच नव्हते!; ‘वेदान्त-फॉक्सकॉन’, ‘टाटा-एअरबस’, ‘सॅफ्रन’बाबत राज्य सरकारची श्वेतपत्रिका
आदित्य ठाकरेंचा आरोप का?
बल्क ड्रग पार्क बद्दलच्या उल्लेखावरून तर हे सिद्ध होते की, मोठ्या प्रमाणात औषध उत्पादनासाठी महाराष्ट्र हा सर्वतोपरी सर्वोत्तम पर्याय असूनही हेतुपुरस्सर त्याकडे दुर्लक्ष केले गेले. सर्वच्या सर्व ३ पार्क नाही, तरी किमान १ पार्क तरी महाराष्ट्राला मिळायलाच हवे होते. एकंदरीतच, हा अहवाल महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला होता, की राज्याला एक नाकर्ता मुख्यमंत्री आणि माहितीशून्य उद्योगमंत्री आहे हे सिद्ध करण्यासाठीच प्रकाशित केला? असा प्रश्न मला पडतोय!, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती.
उदय सामंत काय म्हणाले?
“२०१९-२० ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. तेव्हा महाराष्ट्र उद्योगजगतात एक नंबरला होता. २०२०-२१ ला कर्नाटक राज्य उद्योगजगतात एक नंबरला होते, तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं? २०२१-२२ ला गुजरात राज्य एक नंबरला होते त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते हे सांगून मला अजिबात राजकारण करायचं नाही. परंतु, २०२२-२३ ला जेव्हा एकनाथ शिंदे पुन्हा सत्तेत आल्यानंतर एसबीआयचा रिपोर्ट आहे, १ लाख ११ हजार ४२२ कोटी रुपयांची फॉरेन इन्वेस्टमेंट महाराष्ट्रात झाली आहे”, असं उदय सामंत म्हणाले.