तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ पदावर असलेल्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने फेब्रुवारी अखेरीस दिला होता. यानुसार निवडणूक आयोगाने आता मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांना पदावरून हटवले आहे. यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.
तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ पदावर असलेल्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने फेब्रुवारी अखेरीस दिला होता. या आदेशामुळे चहल यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्या लागणार होत्या. थेट निवडणूक प्रक्रियेत सहभागी नसल्याने आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांना आदेशातून वगळावे, अशी विनंती करणारे पत्र राज्य सरकारने निवडणूक आयोगाला पाठविले होते. मात्र आयोगाने सरकारची ही विनंती फेटाळून लावली होती. त्यानंतरही राज्य सरकारनेही कोणतीही कार्यवाही न केल्याने निवडणूक आयोगाने इक्बाल चहल यांना पदावरून हटवले. याबाबत आदित्य ठाकरेंनी योग्य निर्णय झाल्याची प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा >> मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पदावरून हटवले, बदली रोखण्याची राज्य सरकारची मागणी फेटाळली
ते म्हणाले, “निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सरकारला मुंबईच्या आयुक्तांची बदली करण्याचे निर्देश दिले होते, तरीही मिंधे सरकार गप्पच राहिले. अखेर निवडणूक आयोगाने आज मुंबईच्या आयुक्तांना हटवले. उशीरच झाला, पण निदान योग्य निर्णय झाला. तरीही मुंबई महानगरपालिकेत गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी केलेल्या प्रत्येक घोटाळ्याची चौकशी केली जावी आणि जनतेच्या कराच्या पै अन् पै चा हिशोब केला जावा अशी आमची मागणी आहे!”
इकबाल सिंह चहल यांनी मे २०२० मध्ये करोना काळात टाळेबंदी असताना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यापूर्वीचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची तत्कालीन राज्य सरकारने तडकाफडकी बदली केली होती. टाळेबंदीच्या काळात चहल यांनी रात्रीच पदभार स्वीकारला होता.
चहल यांच्याविषयी….
२० जानेवारी १९६६ रोजी जन्मलेल्या चहल यांनी १२ वी परीक्षेत विज्ञान शाखेत ९६ टक्के गुणांसह राष्ट्रीय गुणवत्ता यादीत स्थान पटकावले होते. इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इलेक्ट्रीकल कम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विषयात बी. टेक. (ऑनर) ही पदवी संपादीत केल्यानंतर चहल यांनी १९८९ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत यश संपादन करून सनदी सेवेमध्ये महाराष्ट्र तुकडीत प्रवेश केला.