Aditya Thackeray अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचं प्रकरण चर्चेत राहिलं त्याचप्रमाणे त्याची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूचं प्रकरणही चर्चेत राहिलं. २०२० मध्ये तिचा मृत्यू झाला. तिने आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला. नंतर तिच्या हत्येचा आरोपही झाला. आता दिशाच्या आई वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

आदित्य ठाकरेंविरोधात याचिका?

दिशाच्या आई वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरेंचं नाव असल्याची चर्चा आहे. दरम्यान दिशा सालियनचा मृत्यू झाला तेव्हा आदित्य ठाकरे कुठे होते? या प्रश्नाचं उत्तर त्यांनी स्वतःच दिलं होतं. आपण जाणून घेऊ त्यांनी काय म्हटलं आहे. त्यावरुन विधानसभेत गदारोळही झाला.

दिशा सालियनच्या आई-वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत काय म्हटलंय?

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या जबाबानुसार ८ जून २०२० च्या त्या रात्री दिशाच्या मालवणी येथील घरात तिच्या जवळच्या मित्रांसह एक पार्टी सुरू होती. मात्र अचानक तिथं आदित्य ठाकरे, त्यांचा एक अंगरक्षक, सूरज पांचोली, दिनो मोरिया ही मंडळी दाखल झाली आणि त्या पार्टीचा माहोलच बदलला. या घटनेनंतर दिशाचं जिवंत राहणं अनेकांना त्रासात टाकणारं होतं म्हणून तिला कायमचं शांत करण्यात आलं, असंही सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे. सदर घटनेनंतर अनेक राजकारणी आणि वरीष्ठ पोलीस अधिकारी अचानक सक्रिय झाले. या घटनेनंतर आदित्य ठाकरेंनी वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवरून सतत संपर्कात होते. याशिवाय दिशाच्या जवळच्या काही व्यक्तींनाही त्यांनी अनेक फोनकॉल्स केले. दिशाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी सुशांतसिंह राजपूत याचाही मृत्यू झाला.

दिशाचा मृत्यू झाला तेव्हा आदित्य ठाकरे कुठे होते?

दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाच्या दिवशी आदित्य ठाकरे घटनास्थळी उपस्थित होते, असा आरोप सातत्याने होतो आहे. मात्र यावर २०२२ मध्ये आदित्य ठाकरेंनी दिशाचा मृत्यू झाला, त्यावेळी ते कुठे होते, यावर एबीपी माझाशी बोलताना खुलासा केला होता. दिशा सालियानचा मृत्यू झाला तेव्हा आपण रुग्णालयात होतो, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते. आजोबांवर (रश्मी ठाकरे यांचे वडील) रुग्णालयात उपचार सुरू होते, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. त्यामुळे कितीही आरोप केले तरी सत्य बाहेर येईल असे आदित्य ठाकरेंनी सांगितलं होतं. तसंच आत्ताही आपण कोर्टात जे बोलायचं ते बोलू असं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे