मावळत्या वर्षांत विदर्भात स्वाईन फ्लूने फारसा उपद्रव नसल्याचा राज्य शासनाचा दावा फोल आहे. विदर्भात स्वाईन फ्लूची  लागण होऊन पाचच्यावर रुग्ण दगावल्याची माहिती आहे. साधारणत: पावसाळ्यात स्वाईन फ्लूची लागण होऊन रुग्ण दगावल्याच्या नोंदी असतात. त्यात विदर्भात जुलै-ऑगस्टमध्ये ४५ रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण होऊन त्यातील पाचच्या वर रुग्ण दगावल्याची माहिती आहे. मात्र, याबाबत राज्य शासन अनभिज्ञ असल्याचे हिवाळी अधिवेशनात विचारलेल्या प्रश्नांवरील उत्तरातून दिसून येते.
उर्वरित महाराष्ट्रात स्वाईन फ्लूमुळे नागरिक दगावल्याने या आजाराचे अस्तित्व स्पष्ट दिसून आल्याचे राज्य शासनाची आकडेवारी सांगते. विदर्भात स्वाईन-फ्लूची लागण झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रातून प्रकाशित झाल्या. मुंबईतील चेंबूरमध्ये एच१ एन१ या विषाणूच्या संसर्गाने जुलैमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. स्वाईन फ्लूचे तब्बल ८१ रुग्ण असल्याचे ऑगस्टमध्ये आढळले. ठाणे व रायगड जिल्ह्य़ात एप्रिल २०१२ पासून स्वाईन फ्लूचे ५१ रुग्ण आढळून आले असून त्यातील पाच रुग्ण दगावल्याबाबतची विचारणा विधान परिषद सदस्य विजय गिरकर यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्यांना केली होती.
यावर आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी ठाणे जिल्ह्य़ात एप्रिलपासून नोव्हेंबर २०१२ पर्यंत स्वाईन फ्लूचे ६२ रुग्ण आढळले असून ठाणे,  नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात चार व कल्याण-डोंबिवली कार्यक्षेत्रात एक अशा एकूण पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. रायगड जिल्ह्य़ात २०१२-१३ मध्ये नोव्हेंबपर्यंत स्वाईन फ्लूचे सात रुग्ण आढळले मात्र, कुणाचाही मृत्यू झाला नाही. मुंबईत स्वाईन फ्लूला आळा घालण्यासाठी विविध रुग्णालयात विलगीकरण कक्षाची सुविधा, अत्यावस्थ रुग्णांसाठी उपचारची सुविधा, उपचारासाठी लागणारी औषधे सर्व रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. वैद्यकीय अधिकारी व निमवैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी लसी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांना एच१एन१ आजार व उपाययोजनांबाबतचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे.