आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामासाठी उपलब्ध कालावधीतील पावसाळ्याचे दोन हंगाम म्हणजे आठ महिने निव्वळ वाया जाणार असून कामाकरिता प्रत्यक्षात केवळ १४ महिनेच मिळणार आहेत. असे असूनही प्रशासनाने अद्याप मोठय़ा प्रकल्पांचे प्रस्ताव शासनासमोर सादर केलेले नाहीत. सिंहस्थ नियोजनाविषयी प्रशासनाने आता बैठकांचे आयोजन करण्याऐवजी प्रत्यक्ष कृती करावी, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा माजी महापौर दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.
मागील कुंभमेळ्यावेळी नाशिकचे महापौरपद पाटील यांनी भूषविले होते. त्या वेळच्या नियोजनबद्ध कामांचे संदर्भ देत पाटील यांनी महापालिकेतील विद्यमान सत्ताधारी आणि प्रशासनावर ताशेरे ओढले. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सूत्रबद्ध नियोजनासाठी सत्ताधाऱ्यांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यास दोन वर्षांहून कमी कालावधी राहिला आहे. आता पावसाळ्याचा हंगाम सुरू होत असून हा आणि पुढील हंगाम लक्षात घेतल्यास कामाचे आठ महिने निव्वळ वाया जाणार आहेत. यामुळे काम करण्यास केवळ १४ महिन्यांचा कालावधी मिळणार असल्याकडे पाटील यांनी लक्ष वेधले. सत्ताधारी व प्रशासन सिंहस्थ नियोजनाविषयी केवळ बैठका घेण्यास मग्न आहे. बैठकांच्या पलीकडे हा विषय जात नाही. इतका कमी कालावधी शिल्लक असताना विकासकामांना प्रत्यक्ष सुरुवात करून चालना देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. आपल्या महापौरपदाच्या कार्यकाळात म्हणजेच गत सिंहस्थापूर्वी साधुग्रामसाठी १४ कोटी रुपयांत ५४ एकर जागा अधिग्रहित करण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेने एकही एकर जागा नव्याने त्यात समाविष्ट केली नसल्याची तक्रार पाटील यांनी केली. साधुग्रामसाठी पुरेशी जागा नसल्यामुळे आगामी सिंहस्थ कसा होणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. साधु-महंत कपिलातीर्थच्या पुढे जाण्यास तयार नाहीत. तपोवनातील जागामालक जागा देण्यास राजी नाहीत. या परिस्थितीत जागेचा तिढा कसा सोडविला जाईल. या घडामोडींमुळे सत्ताधाऱ्यांचे नियोजन नसल्याचे दिसून येत असल्याचा दावाही पाटील यांनी केला.

Story img Loader