प्रशासनाचे दुर्लक्ष; नाकाबंदी असतानाही वाळू वाहतूक
निखिल मेस्त्री, लोकसत्ता
पालघर : टाळेबंदी असताना डहाणू समुद्रकिनाऱ्यावर वाळू उत्खनन जोरात सुरू आहे. रात्री व पहाटे चोरटय़ा मार्गाने वाळू उत्खनन करून त्याची वाहतूक सुरू असल्याचे दिसून येत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
बैलगाडय़ा, लहान टेम्पो व पिकअपच्या मार्फत ही वाळू वाहतूक होत आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी असताना ही वाहने जातात कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत प्रशासनाला तक्रार केल्यानंतरही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. प्रशासकीय व्यवस्थेचा आशीर्वाद असल्यामुळेच वाळूमाफियांना मोकळे रान मिळत आहे, असा आरोप नागरिक करीत आहेत.
रात्री आठ वाजेनंतर व पहाटे पाचच्या दरम्यान नरपड ते डहाणू आगर भागात हे वाळू उत्खनन केले जाते. या ठिकाणाहून ही वाळू वाहनाने नगर परिषद हद्दीत विविध ठिकाणी नेऊन तेथे साठा केली जात आहे. वाहनबंदी असताना ही वाहने जातात कशी, असा सवालही उपस्थित होत आहे. याबाबत विचारणा केली असता डहाणू तहसीलदार राहुल सारंग यांनी प्रतिसाद दिला नाही.वाळू उत्खनन होत असताना समुद्रकिनाऱ्यावर मोठे खड्डे पडल्याचे दिसून येत आहेत. समुद्राला भरती आली की हे खड्डे बुजून जातात. या खड्डय़ांची पोकळी जरी भरून निघत असली तरीही किनाऱ्याची मोठय़ा प्रमाणात धूप होते. यामुळे झाडे उन्मळून पडत आहेत व पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहे.