सोलापूर व माढा लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहितेची अंमलबजावणी प्रभावीपणे राबविण्यात येणार असून निवडणूक निकोप  व निर्भयी वातावरणात पार पडावी म्हणून जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली.
दरम्यान, बुधवारी लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जारी होऊन आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू होताच सांगोला येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कृतज्ञता मेळाव्यासाठी आलेले केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडील लाल दिव्याची शासकीय मोटार जिल्हा प्रशासनाने काढून घेतली. याशिवाय सोलापूरचे पालकमंत्री दिलीप सोपल यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, महापौर अलका राठोड, पालिका व जिल्हा परिषदेच्या इतर पदाधिकाऱ्यांची वाहने काढून घेण्यात आली.
सोलापूर राखीव व माढा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सुरूवात १९ मार्च रोजी होणार असून २६ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. तर २७ मार्च रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होईल. २९ मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येतील. १७  एप्रिल रोजी मतदान होणार तर १६ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. सोलापूर राखीव मतदारसंघातून काँग्रेसकडून केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे, तर माढय़ात राष्ट्रवादीने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांना रिंगणात उतरविले आहे. त्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांची उमेदवारी राहणार आहे.
निवडणूक आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासन कठोर राहणार असल्याचे स्पष्ट करताना जिल्हाधिकारी डॉ.गेडाम यांनी, उमेदवारांना आपल्या खर्चाचा हिशेब सादर करताना स्वतंत्र बँक खाते उघडावे लागणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणूक काळात अवैध धंद्यांवर प्रभावी आळा घालण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असून त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. निवडणुकीच्या काळात स्वतंत्रपणे पोलीस खात्याचे निरीक्षकही येणार असल्याची माहितीही डॉ. गेडाम यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा