तालुक्यांमधील विविध कार्यालये एकाच छताखाली आणून जनतेची सर्व कामे जलद गतीने होण्यासाठी राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये प्रशासकीय इमारती उभारण्यात येतील, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी रावेर येथे जाहीर केले.
सुमारे २७८.६७ लक्ष रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पालकमंत्री संजय सावकारे, आ. शिरीष चौधरी, नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल आदी उपस्थित होते.
महसूल प्रशासनाने केवळ महसूल जमा करण्याचे काम न करता सामाजिक बांधिलकी जपून विविध योजना जनतेपर्यंत पोचविण्याचे काम करण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. कुळ कायदा कलम ४३ चा र्निबध शेरा कमी करून निकाली काढण्यात आलेल्या तालुक्यातील ४१ खातेदारांच्या अर्जापैकी दोन शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते र्निबधमुक्त सात-बारा उताऱ्याचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा प्रशासनाने राबविलेली आधारवड योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
सावदा येथे आयोजित वचनपूर्ती मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आ. शिरीष चौधरींना उमेदवारी देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. तालुक्यातील लोहारा येथे मधुकरराव चौधरी माध्यमिक आश्रमशाळेच्या इमारतीचे उद्घाटन तसेच फैजपूर येथे तापी परिसर विद्या मंडळाच्या धनाजी नाना महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलाचे उद्घाटनही मुख्यंमंत्र्यांच्या हस्ते झाले. मधुकरराव चौधरी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले.

Story img Loader