प्रवेश प्रक्रियेमध्ये अनियमितता केल्याप्रकरणी स.प. महाविद्यालयाला एक लाख रुपये दंड करण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मंगळवारी घेतला असून एम.एस्सी. ऑरगॅनिक केमेस्ट्रीसाठी असलेल्या प्रवेश क्षमतेतील दहा टक्के जागा कमी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
काही महिन्यांपूर्वी ऑरगॅनिक केमेस्ट्रीमध्ये एम.एस्सी. अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये स.प. महाविद्यालयाने अनियमितता केल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे केली होती. एम. एस्सी.ला प्रवेश देताना विद्यार्थ्यांच्या फक्त लेखी परीक्षेचे गुण ग्राह्य़ धरण्यात आले होते. मात्र, नियमानुसार लेखी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा दोन्हीच्या एकत्रित गुणांवर प्रवेश होणे अपेक्षित होते.
प्रवेश प्रक्रियेमध्ये नियमाचा भंग केल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. व्यवस्थापन परिषदेच्या सप्टेंबरमध्ये झालेल्या बैठकीमध्येही हा विषय गाजला होता. त्यावेळी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेने समिती नेमली होती. या प्रकरणावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये मंगळवारी चर्चा झाली. स. प. महाविद्यालयाला एक लाख रुपयांचा दंड करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. त्याचबरोबर पुढील वर्षांसाठी स. प. महाविद्यालयातील ऑरगॅनिक केमेस्ट्रीच्या प्रवेश क्षमतेपैकी दहा टक्के जागा कमी करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
यानंतर प्रवेश प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्यास महाविद्यालयाचे संलग्नत्व कढून घेण्यात येईल अशी तंबी व्यवस्थापन परिषदेने लेखी पत्राद्वारे महाविद्यालयाला दिली आहे, अशी माहिती व्यवस्थापन परिषदेच्या एका सदस्यांनी दिली.
या शिवाय विद्यापीठाच्या संकेतस्थळाचा टेक्निकल रिव्ह्य़ू करून त्यानुसार संकेतस्थळामध्ये आवश्यक ते बदल करण्याचा निर्णयही व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. व्यवस्थापन परिषदेच्या कार्यक्रम पत्रिकेनुसार नियोजित असलेल्या अनेक विषयांवर चर्चा न झाल्यामुळे पुढील आठवडय़ातही व्यवस्थापन परिषदेची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   

Story img Loader