एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत बाहेर पडलेल्या ४० आमदारांच्या बंडखोरीला आता बराच काळ उलटून गेलं असताना अद्याप त्यावेळी घडलेल्या घडामोडींबाबत वेगवेगळे दावे समोर येताना पाहायला मिळत आहेत. अॅड. असीम सरोदे यांनी रविवारी धाराशीमध्ये झालेल्या ‘निर्भय बनो’ सभेमध्ये बोलताना शिंदे गटाच्या आमदारांचा उल्लेख करत गंभीर आरोप केले आहेत. तसेच, यासंदर्भात चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही असीम सरोदेंनी केली आहे. दरम्यान, त्यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना शिंदे गटाकडून संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले असीम सरोदे?

धाराशिव येथे रविवारी संध्याकाळी ‘निर्भय बनो’ सभा पार पडली. यावेळी असीम सरोदेंनी शिंदे गटाच्या बंडावेळी गुवाहाटीमध्ये काय घडलं होतं? यासंदर्भात काही दावे केले आहेत. “गुवाहाटीतल्या त्या हॉटेलमधून एक आमदार पळून गेले. ८ किलोमीटर गेल्यानंतर त्यांना पकडून आणलं गेलं. त्यांना हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली. त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली. त्या दोन आमदारांना कुणी मारहाण केली?” असा सवाल असीम सरोदेंनी उपस्थित केला आहे.

एअर होस्टेसचा विनयभंग व लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न?

दरम्यान, असीम सरोदेंनी आपल्या भाषणात गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये तेव्हा थांबलेल्या एअर होस्टेसचा विनयभंग व त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी कोणत्याही आमदाराचं नाव घेतलेलं नसलं, तरी त्यांनी त्यावेळी त्या हॉटेलमध्ये थांबलेल्या शिंदे गटातील बंडखोर आमदारांचा यावेळी भाषणात उल्लेख केला.

माढ्याच्या जागेवरून महायुतीत खडा पडणार? अजित पवार गटाचा दावा; भाजपा खासदारावर केली टीका!

“गुवाहाटीत ज्या हॉटेलमध्ये हे सगळे थांबले होते, तिथे इतर ग्राहकांना परवानगी नव्हती. पण स्पाईसजेट आणि इंडिगो या दोन विमान कंपन्यांनी त्यांच्यासाठी काही खोल्या तिथे बुक केल्या होत्या. त्या हॉटेलशी त्यांचं वर्षाचं कंत्राट होतं. तिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेस राहात होत्या. त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला गेला. एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कुणी केला? हे महाराष्ट्रानं शोधलं पाहिजे. दारूच्या नशेत हे नेते झिंगत होते. हा पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही”, असं असीम सरोदे उपस्थित लोकांना उद्देशून म्हणाले.

शिंदे गटाचं असीम सरोदेंना प्रत्युत्तर!

दरम्यान, या आरोपांना प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी असीम सरोदेंवरच आरोप केले आहेत. “या पोपटांना काही ठिकाणी जागा मिळाली नाही. दोन आमदारांना मारहाण केली म्हणाले. एवढे सगळे आमदार सोबत होते. त्यांना जाऊन विचारा ना की कुणाला मारहाण झाली. आरोप केल्याशिवाय यांचं वजन वाढत नाही असा त्यांचा समज आहे. एका एअर होस्टेसचा विनयभंग केला म्हणाले. तुला कुठे स्वप्न पडलं? सगळे पोलीस, सुरक्षा व्यवस्था, माध्यमं तिथे असताना असं कसं होईल? दीड वर्षांनंतर याला जाग आली? अशा बेछूट आरोप करणाऱ्यांकडे लक्षच देऊ नये. उबाठा गटाचे नेते खूश होतील या भावनेतून यांनी हे आरोप केले आहेत. आम्ही त्या आरोपांना कवडीचीही किंमत देत नाही”, असं संजय शिरसाट म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adv aseem sarode alleged cm eknath shinde mlas molest air hostess in guwahati hotel pmw
Show comments