संविधानाचे अभ्यासक ॲड. असीम सरोदे यांनी देशावर प्रेम करणारेच लोकशाही रक्षणाचं काम करू शकतात, असं वक्तव्य केलं आहे. तसेच हक्काधारीत दृष्टीकोन कोणत्याही पक्ष किंवा व्यक्तिविरोधात नसतो, असंही नमूद केलं. ते सोमवारी (२४ एप्रिल) सोलापूर जिल्ह्यात बार्शीतील सावळे सभागृहात आयोजित ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य उत्सव’ या विशेष मानवी हक्क कार्यशाळेत बोलत होते.
असीम सरोदे म्हणाले, “हक्काधारीत दृष्टिकोन असला की, अभावापासूनच नाही, तर भयापासून मुक्ती मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याची ताकद मिळते. सन्मानाने व प्रतिष्ठीत जीवन जगण्याच्या हक्कांचा संबंध नागरिकांच्या विकासाची धोरणे, लोकनिधींचा वापर आणि जनतेच्या भल्यासाठी नियोजन यामध्ये सहभाग वाढविण्याशी आहे.”
“हक्काधारीत दृष्टीकोन कोणत्याही पक्ष किंवा व्यक्तिविरोधात नसतो”
“हक्काधारीत दृष्टीकोन कोणत्याही राजकीय पक्ष किंवा व्यक्तिविरोधात नसतो. पण जनतेच्या हक्कांना बाधा पोहोचविण्याऱ्यांचा विरोध म्हणजे त्यांचा द्वेष करणं नाही,” असं मत असीम सरोदे यांनी व्यक्त केले.
“भेदभाव निर्माण होण्याची प्रक्रिया आधी समजून घ्यावी लागेल”
ॲड.असीम सरोदे पुढे म्हणाले, “हक्क व कर्तव्य दोन्ही समजून घ्यावे लागतील तरच हक्काधारीत दृष्टीकोन प्राप्त होईल. वंचित घटकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी विषमता तसेच भेदभाव निर्माण होण्याची प्रक्रिया आधी समजून घ्यावी लागेल. मूलतत्त्ववादी, धर्मांध लोक कोण आहेत हे ओळखताना हे लक्षात ठेवावे की, ते सगळ्या धर्मात व जातीत असतात, ते लोकशाहीविरोधी असतात. त्यांना धर्मनिरपेक्षता मान्य नसते. त्यांना धर्मांधतेवर आधारित समाज निर्माण करायचा असतो. ते स्त्री समानतेच्या विरोधी असतात.”
“लोकशाहीची समज वाढवणं धर्मांधतेइतकं सोपं नाही”
“अशा लोकांना लोकशाहीच्या मार्गावर आणणे हे मानवीहक्कासाठी आवश्यक वातावरण तयार करण्यातील महत्वाचं काम आहे. लोकशाहीची समज वाढविण्यासाठी देशावर प्रेम असणारे नागरिकच काम करू शकतात. कारण ते एखाद्या राजकीय पक्षासाठी किंवा धर्मांधतेसाठी काम करण्याइतकं सोपं नाही,” असंही ॲड.असीम सरोदे यांनी नमूद केलं.
हेही वाचा : “संविधानाने कोणताच देव किंवा धर्म स्वीकारला नाही आणि…”, डॉ. विश्वंभर चौधरी यांचं नास्तिक परिषदेत वक्तव्य
यावेळी कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ते दिनानाथ काटकर, प्रमुख पाहुणे बार्शी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश जाधव, रोटरी क्लबचे अध्यक्ष विजयश्री पाटील, रोटरी क्लबचे प्रोजेक्ट मॅनेजर ॲडव्होकेट विक्रम सावळे, जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वयाचे तालुका समन्वयक मनीष देशपांडे, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे तालुकाध्यक्ष आकाश दळवी उपस्थित होते. बालाजी डोईफोडे, ॲडव्होकेट सुहास कांबळे, किशोर कांबळे, दयानंद पिंगळे, दत्ता दळवी, दत्ता पाटील, सुरेश चकोर, दादा पवार, निलेश मुद्दे, प्रमिला झोंबाडे, अविनाश कांबळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.