दलित, आदिवासी समाजात कर्मकांड आणि जाती व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करणारे, आंबेडकरी चळवळीचे लढाऊ नेते अॅड. एकनाथ आवाड यांचे हैदराबाद येथे निधन झाले. मागील काही दिवसांपासून आवाड यांना रक्तदाबाचा आणि हृदयरोगाचा त्रास होत होता. हैदराबाद येथे त्यांच्यावर अल्सरसाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. आज(सोमवारी) सकाळी त्यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ६५ वर्षांचे होते. मानवी हक्क अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करत त्यांनी ‘कसेल त्याची जमीन’ हे जनआंदोलन उभारले. आवाड यांच्या निधनाने मराठवाडय़ातील पुरोगामी चळवळीचा खंदा समर्थक गेल्याची भावना व्यक्त होत आहे. मंगळवारी तेलगाव येथील नेल्सन मंडेला वसाहत परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
वडवणी तालुक्यातील दुकडेगाव येथे पोतराजाच्या कुटुंबात जन्मलेले अॅड. एकनाथ आवाड यांनी वडिलांचे केस कापून पोतराज प्रथेवर पहिला घाव घातला. घरातूनच कर्मकांड व जातिव्यवस्थेच्या प्रथेविरुद्ध संघर्ष सुरू करून आवाड यांनी पोतराजाच्या प्रथेतून शंभरहून अधिक कुटुंबांची सुटका केली. हलाखीच्या परिस्थितीत गावातच प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर काही लोकांच्या मदतीवर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते औरंगाबाद येथे गेले. त्या काळात आंबेडकरी विचारधारेशी त्यांची नाळ जोडली गेली ती कायमची. समाजसेवा पदविका घेतल्यानंतर ठाणे जिल्ह्यात विवेक पंडित यांच्या विधायक संसद बरोबर मातंग आणि आदिवासी समाजातील कुप्रथांविरोधात आवाड यांनी काम करण्यास सुरुवात केली. काही काळानंतर मूळ गावी येऊन आवाड यांनी मानवी हक्क अभियान या संघटनेची स्थापना करून राज्यभर संघटन उभे केले. तेलगावसारख्या दुर्गम भागात संघटनेचे मुख्यालय करून राज्यभर हजारो कार्यकर्त्यांचे जाळे असणारे ही एकमेव संघटना. दलितांवरील अन्याय अत्याचाराविरुद्ध धावून जाणारी फळी उभी केल्याने आवाड हे ‘जीजा’ म्हणून सर्वदूर परिचित झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. दादासाहेब क्षीरसागर यांच्यासोबत राज्यात ठिकठिकाणी गायरान जमिनी नियमानुकूल करण्यासाठी लढा उभा करून हजारो कुटुंबांना जमिनी मिळवून दिल्या. मानवी हक्क अभियानच्या माध्यमातून दलित आदिवासींना जगण्याचा हक्क देण्यासाठी आवाडांनी प्रदीर्घ लढा दिला. परिणामी २००१ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने वंशभेदविरोधी परिषद घेतली होती. त्यामध्ये समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून एकनाथ आवाड सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी भारतीय समाजातील विषम जातिव्यवस्था हा शोषणाचा मूलाधार असल्याचे सत्य आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रखरपणे मांडले. त्यांनी आपले संघर्षमय जीवन ‘जग बदल घालूनी घाव’, या आत्मचरित्रातून मांडले आहे. दहा वर्षांपूर्वी बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारीवर उस्मानाबाद मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली. त्यातून माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्याशी झालेला संघर्षही वाढला.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या कामावर वेगवेगळ्या संशोधकांनी ५ पुस्तके लिहिली आहेत. २७ जणांनी त्यांनी केलेल्या कार्यावर पीएच.डी.साठी विद्यापीठाकडे प्रबंधही सादर केले आहेत. त्यातील काही विद्यार्थी विदेशी आहेत.
दलित चळवळीचा लढवय्या नेता हरपल्याची प्रतिक्रिया ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. खासदार प्रीतम मुंडे यांनीही श्रद्धांजली अर्पण केली. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दलित समाजाच्या उत्थानासाठी काम करणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली.

Story img Loader