संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सोलापूरमध्ये भर पत्रकार परिषदेत वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अंगावर शाईफेक करत घोषणाबाजी केली. सदावर्ते महाराष्ट्राचे तुकडे करायला निघाले आहेत. त्यांनी मराठा आरक्षणालाही विरोध केला होता, अशा घोषणाबाजी करत या कार्यकर्त्यांनी निषेध केला. यानंतर गुणरत्न सदावर्तेंनी या प्रकारावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. ते शनिवारी (२६ नोव्हेंबर) सोलापूरमध्ये बोलत होते.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “आज भारतीय संविधान दिन आहे. या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार, संजय राऊत, बिळातले तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पिलावळींना माझ्या संवाद यात्रेने सळो की पळो केलं आहे. त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे.”
“मला शरद पवार, उद्धव ठाकरे,अजित पवार यांची कीव येते”
“त्यांना माझा संवाद होऊ द्यायचा नाही. आज संविधानाच्या दिवशी आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सेल्युलर जेलमध्ये उपवास करून आलेली माणसं आहोत. आम्हाला या गोष्टी ‘पाणी कम चाय’ आहेत. मी शाईफेक करणाऱ्यांचा धिक्कार करणार नाही. उलट मला शरद पवार, उद्धव ठाकरे,अजित पवार यांची कीव येते,” अशी टीका गुणरत्न सदावर्तेंनी केली.
व्हिडीओ पाहा :
“छत्रपतींच्या प्रतिमेवरही काळी शाई टाकली”
सदावर्ते पुढे म्हणाले, “त्यांना लाज वाटली पाहिजे. संविधान दिनी माझ्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा हातात होती आणि बोलत होतो. त्यावेळी छत्रपतींच्या प्रतिमेवरही काळी शाई टाकण्यात आली. या लोकांना आम्ही घाबरत नाही, आम्ही त्यांना उत्तर देऊ.”
“शरद पवार, अजित पवार माफी मागणार आहेत का?”
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मी सांगेन की, या असंवैधानिक वर्तणुकीवर योग्यवेळीच कारवाई केली पाहिजे. संविधान दिनी असे हल्ले करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. शरद पवार, अजित पवार माफी मागणार आहेत की नाही,” असा प्रश्न सदावर्तेंनी यावेळी विचारला.