अ.भा.पंचायतराज संघटनेचे अ‍ॅड. सचिन नाईकांचा सवाल
राज्यात महसूल विभागात उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, कनिष्ठ लिपीक, तलाठी, शिपाई, वाहनचालक आणि पोलीस पाटलांची अक्षरश हजारो पदे रिक्त असतांना उद्यापासून महसूल वर्षांचा पहिला दिवस म्हणून महसूलदिन आणि ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्याची या खात्याचे राज्यमंत्री संजय राठोड यांनी केलेली घोषणा कशाच्या भरवशावर अंमलात आणणार, असा सवाल अखिल भारतीय कांॅग्रेसच्या राजीव गांधी पंचायतराज संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस अ‍ॅड. सचिन नाईक यांनी येथे केला आहे.
यंदा १ ते ७ ऑगस्टदरम्यान महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्टही असल्यामुळे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील महसूल विभागातील महिलांच्या सत्कारांचे आयोजन केले आहे. या सप्ताहात महिला व विद्यार्थिनींच्या समस्या प्राधान्यक्रमाने सोडविण्यात येणार आहेत, असेही महसूल राज्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. ‘ताई, मावशी, आक्का.. आता जग जिंका’ अशी घोषणाही महसूल विभागाने दिली आहे. १ ते ३१ जुल हे महसूल वर्ष मानले जाते. या कालावधीत वर्षभरातील महसूल आकारणी व वसुलींचा ताळमेळ बसविण्याचे काम या यंत्रणेकडून केले जाते. दरवर्षी उद्दिष्ट पूर्तता करणाऱ्या या यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव म्हणून १ ऑगस्टला महसूलदिन साजरा करण्यात येतो. उद्या राज्यातील सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी कर्तव्यनिष्ठेची शपथ घेणार आहेत. याशिवाय, या महसूल सप्ताहात महिलांच्या समस्या प्राधान्याने साडविण्यात येणार आहे. शेतकरी महिलांचा सातबारा, फेरफार अद्यद्यावत करण्यात येईल, असे महसूल राज्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
या महसूल सप्ताहात उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गरज असतांना रिक्त असलेल्या या हजारो जागा कधी भरणार, हेही राज्यमंत्र्यांनी सांगायला पाहिजे. अ‍ॅड. सचिन नाईक म्हणाले, महसूल राज्यमंत्र्यांच्या यवतमाळ जिल्ह्य़ात महसूल विभागात ‘दिव्याखाली अंधार’ अशी स्थिती आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांची ४, तहसीलदारांची ६, नायब तहसीलदारांची ३, अव्वल कारकुनांची १३, कनिष्ठ लिपिकांची ४८, मंडळ अधिकाऱ्यांची १७, तलाठय़ांची २१, शिपायांची ११, वाहनचालकांची ७, कोतवालांची ८१, तर पोलीस पाटलांची २०१ पदे रिक्त आहेत. अशी स्थिती राज्यातील सर्व जिल्ह्य़ांमध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader