नगरमध्ये न्यायाधीश म्हणून काम करताना चांगले अनुभव मिळाले, वकील संघटनेचेही चांगले सहकार्य लाभले, त्यामुळेच आपण येथे चांगले काम करू शकलो, असे प्रतिपादन जिल्हा सत्र न्यायाधीश बी. यू. देबडवार यांनी येथे केले.
पदोन्नतीवर बदली झालेले जिल्हा न्यायाधीश देबडवार, आर. जी. वानखेडे, एस. के. रिझवी, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. आर. शर्मा व आर. एस आडकीन आदींचा गौरव करून निरोप देण्यात आला. त्या वेळी देबडवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सत्र न्यायाधीश एस. झेड. ख्वाजा आदी उपस्थित होते.
सध्याच्या काळात न्यायाधीश म्हणून काम करणे कोठेही सोपे राहिलेले नाही. त्यात नगरमधील काम आव्हानात्मक होते. येथील अनुभवाचा निश्चितच फायदा होईल, असेही देबडवार म्हणाले. वकील व न्यायाधीश यांना अतिशय विचाराने व संयमी भावनेने काम करावे लागते. दोघांनाही विविध पैलूंतून जावे लागते. यासाठी बदलणाऱ्या कायद्याचा सातत्याने अभ्यास करावा लागतो, असे वानखेडे या वेळी म्हणाले.
महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे सदस्य अशोक पाटील यांचेही भाषण झाले. संघटनेचे अध्यक्ष मुकुंद पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सतीश भोपे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, संघटनेचे पदाधिकारी अभिषेक भगत, आतिष निंबाळकर, अनिता दिघे, मंगेश सोले, नीलेश हराळे, किशोर देशपांडे, अशोक कोठारी, सुरेश लगड, युवराज पाटील, गजेंद्र पिसाळ, विश्वासराव आठरे, अनिता पाटील, सुजाता गुंदेचा, अशोक झरेकर, विजय भगत आदी उपस्थित होते.

Story img Loader