कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील ४० गावांसदर्भात मोठे विधान केले आहे. या ४० गावांनी कर्नाटकमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यांनी तसा ठराव केलेला आहे, असे बोम्मई म्हणाले आहेत. बोम्मई यांच्या याच विधानानंतर राज्यातील राजकीय नेते आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडून सत्ताधारी शिंदे गट- भाजपावर सडकून टीका केली जात आहे. तर महाराष्ट्राचे एकही गाव कर्नाटकमध्ये जाणार नाही, असे आश्वासन सत्ताधाऱ्यांकडून दिले जात आहे. बोम्मई यांच्या या विधानामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात असताना आता अॅड. गुणरत्न सदावर्ते विदर्भ आणि मराठवाडा अशी दोन वेगळी राज्ये निर्माण करावीत, अशी मोठी मागणी केली आहे. तसेच याच मागणीसंदर्भात आगामी रणनीती ठरवण्यासाठी शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> विश्लेषण: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटणार तरी कधी? हा वाद काय आहे?

“मराठवाडा आणि विदर्भ ही वेगळी राज्ये निर्माण झाली पाहिजेत. त्यांचा कारभार स्वातंत्रपणे चालला पाहिजे. या भागातील मानवी विकासासाठी तसेच मागासलेपण संपवण्यासाठी मराठवाडा, विदर्भ ही नवी राज्ये निर्माण झाली पाहिजेत,” अशी मागणी सदावर्ते यांनी केली. तसेच याच मागणीला घेऊन उद्या (२४ नोव्हेंबर) उस्मानाबाद येथे मोठी संवाद परिषद आयोजित करण्यात आली आहे. आमची मागणी सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा >>> गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सुट्टी, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका; पाकिस्तानचा उल्लेख करत म्हणाले “तर उद्या पूर्ण देशाला…”

“या परिषदेला सर्व जाती-धर्माचे लोक येणार आहेत. परिषदेसाठी विद्यार्थी, वकील, शिक्षक, महिला उपस्थित राहणार आहेत. स्वतंत्र मराठवाडा व्हावा या एका भावनेतून हे सगळे जमा होतील. आमची स्वतंत्र मराठवाडा झाला पाहिजे, ही मागणी आहे. राजकारण करायचे म्हणून आम्ही ही भूमिका घेतलेली नाही. मानवी विकास व्हावा हाच आमचा केंद्रबिंदू आहे. या परिषदेला सुज्ञ नागरिक येतील, याचा मला विश्वास आहे,” असेही सदावर्ते म्हणाले.

हेही वाचा >>> फडणवीसांकडून कोश्यारींची पाठराखण, मग भाजपाचा धिक्कार करणार? उदयनराजेंनी केलं स्पष्ट; म्हणाले “पक्ष बिक्ष…”

“उद्याच्या परिषदेत वेगळ्या मराठवाड्याच्या मागणीसाठीची आगामी रणनीती ठरवण्यात येणार आहे. या परिषदेत वेगळा विदर्भ, स्वतंत्र मराठवाडा या मागणीला घेऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी आम्ही करणार आहोत,” असेही सदावर्ते यांनी सांगितले.

“ज्या प्रकारे तेलंगाणा, छत्तीसगड स्वतंत्र राज्य झाले, अशाच पद्धतीने मराठवाडा आणि विदर्भ वेगळे राज्य व्हावे अशी आमची मागणी आहे. उद्याच्या परिषदेत आम्ही आम्हाला पाठिंबा असणाऱ्यांची नावे जाहीर करणार आहोत,” अशी माहिती सदावर्ते यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Advocate gunratan sadavarte demand separate vidarbha and marathwada state amid basavaraj bommai comment on maharashtra prd