Disha Salian Death Case : दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली केली आहे. यामध्ये दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाद्वारे (सीबीआय) करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आता या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिशा सालियनचे वडील सतिश सालियन यांचे वकिल अभिषेक मिश्रा आणि ईश्वर अग्रवाल हे आज मालवणी पोलीस ठाण्यात गेले होते. त्यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला.
अभिषेक मिश्रा म्हणाले, “पोलिसांकडे असलेले कागदपत्रे आम्ही आज मागायला आलो होतो. त्यांच्याकडे असलेले फॉरेन्सिक रिपोर्ट, डायरी, सीसीटीव्ही फुटेज, कॉल डेटा रिपोर्ट देण्याची आम्ही पोलिसांकडे मागणी केली आहे. आज ते पोस्टमार्टम रिपोर्ट देणार आहेत. बाकीचे कागदपत्रे सोमवारी देणार आहेत. कोर्टात हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आम्ही तिथे या कागदपत्रांच्या आधारांवर स्ट्राँग भूमिका घेणार आहोत.”
२ एप्रिलला होणार सुनावणी
अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आणि त्यांच्या मुलीच्या मृत्यूची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली. दिशा सालियन यांनी असा आरोप केला की, रहस्यमय परिस्थितीमुळे हे प्रकरण घडले. मुंबई उच्च न्यायालयाच्या वेबसाइटवरील केस स्टेटसनुसार, २१ मार्च रोजी वकील अभिषेक मिश्रा यांच्यामार्फत दाखल केलेली याचिका २ एप्रिल रोजी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि नीला के गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी स्वयंचलितपणे सूचीबद्ध आहे.
जानेवारी २०२४ मध्ये शिवसेना -यूबीटी नेते आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध कार्यकर्ते आणि वकील रशीद खान पठाण यांनी दिलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांना प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्याचे निर्देश देण्याची आणि तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) हस्तांतरित करण्याची मागणी या रिट याचिकेत करण्यात आली आहे.
दिशा सालियन कोण होती?
बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर म्हणून दिशा सालियन कार्यरत होती. ८ जूनच्या रात्री मालाड येथील इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला होता. सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी आत्महत्या केल्यानंतर दिशाच्या प्रकरणाला राजकीय वळण लागले होते.