मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूरमध्ये खंडपीठ व्हावे या मागणीसाठी सुरू असलेल्या काम बंद आंदोलनावर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. राज्य शासनाने सर्किट बेंच सुरू व्हावे यासाठी सकारात्मक निर्णय घेत उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीशी पत्रव्यवहार केला असल्याने वकील संघटनांनी आता काम बंद आंदोलनाबाबत योग्य विचार करावा असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक शिवाजीराव राणे, धर्यशील पाटील, महादेवराव मोहिते, अशोकराव चव्हाण, संभाजीराव मोहिते या वकिलांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री चव्हाण यांची कराड येथे भेट घेतली. गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील उपस्थित होते. सर्किट बेंचबाबत आपण न्यायमूर्तीशी दोनदा पत्रव्यवहार केला आहे. दुसऱ्या पत्रात तर निधीची तरतूद केल्याचे नमूद केले आहे. मात्र सहा जिल्हय़ांतील वकील संघटनांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या विषयावर मुख्यमंत्री न्यायमूर्तीशी चर्चा करावी अशी विनंती शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना केली. तसेच सर्किट बेंच होणे कसे आवश्यक आहे. ते पटवून द्यावे अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेताना, प्रथम बहिष्काराच्या कृतीवर विचार करण्याचे सुचविले.