‘काका मला वाचवा’म्हणणाऱ्याची काकांवरच कुऱ्हाड
माजी मुख्यमंत्री दिवं. सुधाकरराव नाईक आणि त्यांचे धाकटे बंधु आमदार मनोहरराव नाईक यांचे पुतणे राष्ट्रवादीचे प्रदेशोरचिटणीस व जि.प. माजी अध्यक्ष अॅड. निलय नाईक यांच्या भाजप प्रवेशाने नाईक घराण्याचा गेल्या साठ वर्षांचा सत्तेचा बुरूज उद्ध्वस्त होणार काय, या चर्चेने सारे राजकीय वातावरण ढवळून निघत आहे.
विशेष हे की, सारे बळ एकवटून मनोहर नाईक सांगतात की, बरे झाले ‘सुठेंवाचुन खोकला गेला’, तर निलय नाईकांच्या मते ‘काका मला संधी द्या’, असे शंभरदा मनूकाकांना सांगूनही त्यांनी पुत्रप्रेमापोटी आपल्याला कधीच संधी न दिल्याने दोन वर्षांंपासून आपण भाजपत येण्याच्या मानसिकतेत होतो. आता योग्य वेळ आल्याने भाजपत प्रवेश केला आहे. ८ ऑक्टोबरला रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी समारोहासाठी येथे आले असतांना भागवतांच्या कार्यक्रमात व्यासपीठावर निलय नाईक त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते तेव्हाच निलय नाईकांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. लोकसत्ताने एका वृत्तविश्लेषात ते भाजपच्या वाटेवर असल्याचे दोनदा वृत्त प्रसिध्दही केले होते. ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका अशा कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यत्वपदाचा अनुभव नसतांनाही निलय नाईकांनी सलग पाच वर्षे जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवले होते, पण नंतर मात्र गेल्या दहा वर्षांंपासून कोणतेच पद कुठेही नसल्याने त्यांची होत असलेली धुसमट आणि काका मनोहर नाईक यांनी अडगळीतीले सामान समजून केलेली उपेक्षा, यामुळे अखेर त्यांनी भाजपाचा आश्रय घेतला. भाजपलाही नाईक घराण्याच्या साम्राज्याचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी विभिषणाचीच आवश्यकता होती. या निमित्ताने ती गरज पूर्ण झाली. आता नाईकांचा बालेकिल्ला खरेच उद्ध्वस्त होतो काय, हाच कळीचा मुद्दा आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष असतांना दोनदा आलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या वेळी ‘काका मला वाचवा’ हा ऐतिहासिक दाखला देत निलय नाईक काकाचरणी नतमस्तक झाले होते आणि काकांनी ‘लक्ष्मी’च्या सहाय्याने निलयला वाचवले. तो इतिहास निलय विसरले. इतकेच नव्हे, तर काकांविरोधात विधानसभा लढून नाईक घराण्यात प्रथमच बंडाचे डफडे वाजवल्याचा आरोप मनोहर नाईक करीत आहेत. निवडणुकीत मनोहर नाईक विजयी झाले. नाईक घराण्यात अॅड.निलय नाईकांनी पराभवाचा इतिहास रचला. मात्र, आता भाजपच्या मदतीने पुतण्याने काकासमोर प्रचंड आव्हान उभे करून आगामी विधानसभा निवडणुकीत काकांचे साम्राज्य जमीनदोस्त करण्याचा विडा उचलल्याची चर्चा आहे. आपल्या विरोधात लढलेल्या श्रीराम अंभोरेंपासून, डॉ. आरती फुफाटेंपर्यंतच्या डझनभर दिगज्जांना आपल्या पक्षात ओढण्याचे कसब मनोहर नाईकांजवळ असले तरी त्यांनी आपल्याविरुध्द लढलेल्या रक्ताच्या नात्यातील अर्थात, या पुतण्याला मात्र बंडखोरीची शिक्षा देत राजकारणाच्या सत्तेपासून कोसो दूर ठेवले आहे. आता त्याची शिक्षा पुतण्याच काकांना देत असल्याचे चित्र आहे.
नाही म्हणायला, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीसपद अजितदादा पवार यांनी अॅड.निलय नाईकांना दिले होते. आपले काका मनोहरराव नाईक पुत्रप्रेमापोटी ययाती नाईक यांना जिल्हा परिषदेत उपाध्यक्षपद किंवा सूतगिरणीत उपाध्यक्षपद देतात, पण आपल्याला अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत डावलतात, ही अॅड.निलय नाईकांची खंत त्यांच्या ह्रदयात इतकी दाटली आहे की, आता सहन होत नाही. संयमाचा बांध कधी फुटेल सांगता येत नाही, अशी त्यांची अवस्था झाली होती. आता संयमाचा बांध फुटला अन् त्यांनी ‘कमळ’ हाती घेतले. निलय नाईकांच्या भाजप प्रवेशांचा किती फायदा होतो, हे काळ ठरवणार असला तरी सध्या मात्र भाजपला कमालीचा विश्वास असून मनोहर नाईकांचे राजकीय सत्तेचे नामोनिशान संपणार, अशी आशा वाटत आहे.