अॅलोपॅथी पदवीधरास आयुर्वेद शाखेत पदव्युत्तर (एम.डी) पदवी घेण्याचा मार्ग मोकळा करण्याचा प्रस्ताव ‘आयुष’ मंत्रालय विचारार्थ घेणार असल्याने अॅलोपॅथीचे आयुर्वेद शास्त्रावरील हे संभाव्य ‘अतिक्रमण’ आयुर्वेद ‘प्रेमीं’च्या पोटात गोळा निर्माण करणारे ठरत आहे. केंद्रीय ‘आयुष’ मंत्रालयाने भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेची एक बैठक ६ जानेवारीला दिल्लीत ‘आयुष’ भवनात बोलावली असून चिकित्सा परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या सात सदस्यांना निमंत्रित केले आहे.
या बैठकीत एमबीबीएस डॉक्टरांना एम.डी.(आयुर्वेद) व एम.एस.(आयुर्वेद) या पदव्युत्तर शाखेत प्रवेश देण्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल करण्यावर चर्चा होणार आहे, तसेच बीएएमएस पदवी पातळीवर आयुर्वेदपूर्व अभ्यासक्रमाचा समावेश, अभ्यासक्रमाची निश्चिती, त्यासाठी आयुर्वेद महाविद्यालयांची पूर्वसंमती, ‘नीट’च्या धर्तीवर पदवी व पदव्युत्तर पातळीच्या सामायिक प्रवेश परीक्षा, असे प्रमुख विषय या बैठकीत चर्चिले जाणार आहेत. आयुर्वेद शाखेत अॅलोपॅथीचा हा प्रवेश म्हणजे, आयुर्वेद शाखेवरील अतिक्रमण असल्याची भावना आयुर्वेदप्रेमींमध्ये पसरली आहे. हे कां केले जात आहे, याची कुठेही कारणमीमांसा झालेली नाही, असा सूर आहे. भारतीय चिकित्सा पध्दतीचाच विचार करणाऱ्या ‘आयुष’ने अॅलोपॅथीचा विचार करण्याचे कारण नाही. अॅलोपॅथीच्या अभ्यासकांनी आयुर्वेदाचा कायम दुस्वास केला. दुय्यम वागणूक दिली आहे. आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथीच्या कोटय़वधीच्य औषध व्यवसायाला गिळंकृत करण्याचा तर हा डाव नाही नां? भारतभर वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या लाखो आयुर्वेद डॉक्टरांना अॅलोपॅथीच्या दावणीला बांधण्यासारखे असतांनाही निर्णय प्रक्रियेत त्यांचे मत विचारात घेतले जात नाही. जर ‘आयुष’ला हा निर्णय भारतीय चिकित्सा पध्दतीच्या भल्यासाठी घ्यायचा असेल, तर एक प्रस्ताव मान्य करावा. सर्व वैद्यकीय शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रम सर्वांसाठी खुले करावे. म्हणजे, कोणत्याही वैद्यकीय शाखेचा सक्षम विद्यार्थी त्याला अपेक्षित पदव्युत्तर विषयाची निवड करू शकेल, अशी भूमिका चिकित्सा परिषदेचे एक सदस्य डॉ.विश्वजीत सिंग यांनी घेतली आहे.