राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. २०२४ नंतर राजकारणाची समीकरणं बदलणार असून नवीन पिढीलाच निर्णय घावे लागणार आहेत, अशा अर्थाचं विधान रोहीत पवार यांनी केलं आहे. ते जुन्नर येथील एका सभेत बोलत होते. आपण फार पुढचा विचार करून राजकारणात आलो आहोत, असंही ते यावेळी म्हणाले.
रोहित पवार यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, “२०२४ नंतरची वेळ ही युवकांची आहे. ही वेळ आमची आहे. २०२४ ला आपल्याला सर्वांबरोबर राहून आपल्या विचारांचं सरकार कसं येईल? यासाठी मनापासून काम करायचं आहे. जेव्हा आपली वेळ येते, तेव्हा निर्णयदेखील आपल्यालाच घ्यावे लागतील. त्या निर्णयांमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचं मार्गदर्शन आपल्याला असेलच, पण कोणतं काम कसं करायचं? आणि कुणाकडे कोणतं पद द्यायचं? याचे निर्णय नवीन पिढी घेईल” असं विधान रोहित पवार यांनी केलं आहे.
हेही वाचा- गुलाबराव पाटलांची उद्धव ठाकरेंविरोधात नाराजी, अखेर मनातील खदखद आली बाहेर
“मी म्हणत नाही की हे काम आम्ही करू, पण नवीन पिढी त्याठिकाणी निर्णय घेणार आहे. मी फार पुढचा विचार करून राजकारणात आलो आहे. मी पदाचा विचार केला असं नाही, पण मतदारसंघासाठी आणि महाराष्ट्रासाठी खूप काही करायचं आहे,” असंही रोहित पवार आपल्या भाषणात म्हणाले.