देशाने १९८८ साली अतिवृष्टीचे वर्ष अनुभवल्यानंतर यंदा पुन्हा एकदा असेच घडण्याची चिन्हे आहेत. देशात पावसाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यांत १७ टक्के जास्त पाऊस पडला असून, पुढील दोन महिनेसुद्धा मोठय़ा पावसाचे जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे २५ वर्षांनंतर देश पुन्हा एकदा अतिवृष्टीला सामोरा जात आहे. विशेष म्हणजे धो-धो पावसाचा प्रदेश असलेल्या ईशान्य भारतावर अवकृपा झालेली असतानासुद्धा देशात इतरत्र पडलेल्या प्रचंड पावसामुळे हे चित्र निर्माण झाले आहे.
या हंगामात देशात पहिल्या दोन महिने सलग पावसाचाच काळ राहिला. आतापर्यंत सरासरीच्या ११७ टक्के इतका पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे जास्त पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या ईशान्य भारतात पावसाने ओढ दिली आहे. तिथे पहिल्या दोन महिन्यांत सरासरीच्या केवळ ६७ टक्के इतकाच पाऊस पडला. तरीसुद्धा देशाच्या इतर भागात पडलेल्या जोरदार पावसामुळे ही कमी भरून काढून पावसाचा आकडा सरासरीच्या पलीकडे नेला आहे. हवामान विभागाने दोनच दिवसांपूर्वी पुढील दोन महिन्यांच्या पावसाचा अंदाज जाहीर केला. त्यानुसार, या काळात सरासरीच्या तब्बल ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात पावसावर ‘एल-निनो’ या प्रतिकूल घटकाची वक्रदृष्टी राहण्याची शक्यता नगण्य आहे. त्यामुळे हा अंदाज प्रत्यक्षात उतरण्याचीच दाट शक्यता आहे. परिणामी देशात सरासरीपेक्षा किमान १० टक्के जास्त पाऊस निश्चित पडेल, असे हवामानतज्ज्ञ सांगत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा