माजी आमदार लक्ष्मण माने यांच्याविरुद्ध त्यांच्याच संस्थेतील पाच महिलांनी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी व त्यानंतर लैंगिक छळाचे गुन्हे दाखल होऊन आठवडा उलटला तरी या प्रकरणी पोलिसांना अद्याप त्यांचा संपर्कही होऊ शकलेला नाही.
माने यांच्या संस्थेतील तब्बल पाच महिलांनी ते त्यांच्यावर २००३ पासून शारीरिक अत्याचार करत असल्याच्या गंभीर तक्रारी गेल्या आठवडय़ात केल्या होत्या. यानुसार माने यांच्याविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात मानेंच्या विरुद्ध लैंगिक छळाचे गुन्हे दाखल झालेले आहेत.
महिलांवरील अत्याचाराबरोबरच माने यांचा शोध घेण्यात होत असलेल्या या दिरंगाईचाही आता निषेध होऊ लागला आहे. शिवसेना, भाजपच्या महिला आघाडीने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. तर माने यांची ‘पद्मश्री’ पदवी काढून घेऊन संबंधित आश्रमशाळेवर प्रशासक नेमण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर विभागाचे उपाध्यक्ष फत्तेसिंह पवार यांनी केली आहे. दरम्यान या महिलांवर खरोखरच अत्याचार झाले असतील तर त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहू असे अॅड वर्षां देशपांडे यांनी सांगितले आहे.
पीडित महिला या ३० ते ३५ वर्षे वयोगटातील असून आश्रमशाळेमध्ये त्या आचारी म्हणून रुजू झाल्या होत्या. तेव्हापासूनच माने त्यांचे लैंगिक शोषण करीत असल्याचा आरोप सदर महिलांनी केला आहे. पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारींनुसार सातारा येथील आश्रमशाळा आणि पुणे येथील सरकारी विश्रांतिगृहात बलात्कार करण्यात आल्याचे म्हटले आहे. तक्रार करणाऱ्या महिलांपैकी एका महिलेने विश्रामगृहातील ‘ती’ खोली ओळखली असून तिथून पोलिसांनी काही वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. विशेष म्हणजे आपली नोकरी जाईल या एकाच भीतीपोटी तक्रार करण्यास आजवर पुढे न आल्याचे महिलांनी सांगितले. कामावर रुजू होतानाच आपली तारीख नसलेल्या राजीनामापत्रावर स्वाक्षरी घेण्यात आल्याचा आरोपही पीडित महिलांनी केला.माने कुटुंबीयांनी सर्व आरोप एका निवेदनाद्वारे फेटाळले आहेत.