शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अर्वाच्च भाषेत टीका केली. सत्तारांच्या या विधानानंतर राज्यभरातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून त्यांनी सत्तारांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
हे प्रकरण ताजं असताना आता माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी गलिच्छ भाषा वापरली आहे. शिवसेनेच्या नेत्यांवर टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे. शिवसेना नेते अनिल परब, सुभाष देसाई आणि विनायक राऊत यांच्यावर टीका करताना रामदास कदमांनी गलिच्छ भाषा वापरली आहे. ‘एबीपी माझा’शी बोलताना त्यांनी हे अपशब्द वापरले आहेत.
शिवसेनेच्या नेत्यांचा एकेरी उल्लेख करत रामदास कदम म्हणाले की, अनिल परब यांना लवकरात लवकर तुरुंगात टाकायला पाहिजे. त्यांना आत टाकण्यात एवढा उशीर का होत आहे? हेच मला कळत नाही. माझ्या मुलावर सगळ्यात जास्त अन्याय अनिल परबांनी केलाय. दापोली आणि मंडणगडची नगरपरिषद शिवसेनेच्या ताब्यात होती. पण अनिल परबांनी माझा मुलगा योगेश कदम यांना बाजुला ठेऊन, या नगरपरिषदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या घशात घालण्याचं काम केलं.
अनिल परबांनी शिवसेना संपवण्याची सुपारीच घेतलीय. उद्धव ठाकरेंना अशीच माणसं आजुबाजूला लागतात… असं म्हणत रामदास कदमांनी शिवराळ भाषेचा वापर केला आहे. यावेळी त्यांनी अनिल परब यांच्यासह सुभाष देसाई आणि विनायक राऊतांचाही अर्वाच्च भाषेत उल्लेख केला. सुभाष देसाई हा कान चावणारा आणि कानात बोलणारा माणूस आहे. जोपर्यंत हे नेते उद्धव ठाकरेंच्या आजुबाजूला आहेत, तोपर्यंत त्या पक्षाचं काहीही खरं नाही, असंही रामदास कदम म्हणाले.