विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन चालू असून विधानसभेसह विधान परिषदेतही सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. सोमवारी (१ जुलै) विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (ठाकरे गटाचे आमदार) यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका व शिवीगाळही केली. त्यानंतर भाजपा आमदारांनी दानवेंच्या निलंबनाची मागणी केली. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी लगोलग दानवे यांना पाच दिवसांसाठी विधीमंडळातून निलंबित केलं. दुसऱ्या बाजूला अंबादास दानवे यांच्या चुकीबद्दल शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभागृह, उपसभापती, सभागृहातील महिला सदस्यांची क्षमा मागितली आहे. त्याचबरोबर दानवे यांनी याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली असून त्यांचं निलंबन मागे घेतलं जाणार असल्याची चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“अंबादास दानवे यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांना माफी मागावी लागली”, अशा शब्दांत विरोधक दानवेंवर टीका करत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्हणाले, माझ्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने माफी मागणं हा त्यांच्या संस्कृतीचा आणि शिकवणीचा भाग आहे. परंतु, ज्या लोकांना संस्कृती आणि शिकवण दोन्ही नाही, जे लोक नेहमी स्वतःच्या मस्तीत फिरत असतात त्यांनी यावर बोलू नये.

विधान परिषदेच्या सभागृहात अंबादास दानवे यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती. त्यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दानवे यांना विधान परिषदेतून पाच दिवसांसाठी निलंबित केलं होतं. त्यानंतर आता दानवे यांनी या शिवीगाळ प्रकरणी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी माफी देखील मागितली आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन मागे घेतलं जाण्याची शक्यता आहे. दानवे यांनी आज स्वतः नीलम गोऱ्हे यांना भेटून दिलगिरी व्यक्त करणारं पत्र त्यांना दिलं आहे.

दुसऱ्या बाजूला अंबादास दानवे यांचे निलंबन मागे घेतलं जावं यासाठी ठाकरे गटाने प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांची एक बैठक चालू आहे. त्याचबरोबर विधान परिषदेत आमदार अनिल परब यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे दानवे यांचं निलंबन मागे घेण्याची विनंती केली आहे.

हे ही वाचा >> “लाडकी बहीण योजनेत अडथळा आणाल, तर…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सरकारी कर्मचाऱ्यांना इशारा!

दिलगिरी व्यक्त करणारं पत्र उपसभापतींना दिल्यानंतर दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, त्या प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी आधीच भूमिका मांडली आहे. माझ्या तोंडून काही शब्द निघाले असतील तर स्वतः माझ्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. सभागृहाचं पावित्र्य राखताना माझ्याकडून काही चुकीचं झालं असेल. हे पावित्र्य राखण्यासाठी माझी सभागृहात दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After apology neelam gorhe can withdraw ambadas danve suspension prasad lad abuse case