शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झालं आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर, “आम्ही अजून शिवसेनेतच आहोत” असा दावा शिंदे गटातील आमदारांकडून केला जात आहे. तसेच काही आमदारांनी उद्धव ठाकरेंबाबत नाराजी व्यक्त केली असली तरी उघड टीका केली नाही. आम्ही उद्धव ठाकरेंना मानतो आणि त्यांच्याबाबत आम्हाला आदर आहे, अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतली आहे.

शिंदे गटाच्या आमदारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरेंवर टीका करणं भाजपा नेत्यांना अवघड जात आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अलीकडेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आक्षेप घेतला होता. उद्धव ठाकरे हे आजही आमचे आदरणीय असून आजही त्यांनी आम्हाला बोलवावं, आम्ही जायला तयार आहोत. उद्धव ठाकरे यांच्याविषयी कुणी काहीही बोललं तर ते आम्ही खपवून घेणार नाही, अशी भूमिका दीपक केसरकर यांनी घेतली होती. त्याबाबतची तक्रार त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

यानंतर आता उद्धव ठाकरेंबाबत किरीट सोमय्यांचा सूर बदलल्याचं दिसत आहे. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना किरीट सोमय्यांना यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला भलतंच उत्तर दिलं आहे. आजच्या निकालावर लोकशाहीची दिशा ठरेल, असं उद्धव ठाकरे म्हणतात, याबाबत तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न विचारला असता त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करणं टाळलं आहे. उद्धव ठाकरेंबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. “मला हे समजत नाही की, २०१९ मध्ये ज्यांनी नरेंद्र मोदींच्या नावाने मतं मागितली, ते संजय राऊत विश्वासघाताची भाषा करतात, याचं मला हसायला येतंय,” असं उत्तर सोमय्या यांनी दिलं आहे.

हेही वाचा- उद्धव ठाकरे यांच्यावरील टीका खपवून घेणार नाही ; दीपक केसरकर यांचा इशारा

दरम्यान, माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “मागील सरकारने गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राची वाट लावण्याचं काम केलं आहे. आता शिंदे-फडणवीस सरकार दुप्पट गतीने महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर घेऊन जाणार आहे. महाराष्ट्रात जे परिवर्तन झालं आहे, त्याला न्याय मिळेल आणि दुप्पट गतीने सरकार पुढे जाईल” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.