महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राष्ट्रपती कार्यालयाने महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाच्या जबाबदारीपासून मुक्त केले आहे. आता झारखंडचे राज्यपाल असलेले रमेश बैस हे नवे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारतील. राज्यपालांच्या पदमुक्तीचा निर्णय जाहीर होताच. विरोधक आणि सत्ताधारी या दोन्ही बाजूंनी आज प्रतिक्रियांचा ओघ लागला होता. सर्वच नेते हिरीरीने प्रतिक्रिया देत होते. विरोधक या निर्णयाने खूश झाले होते. तर सत्ताधाऱ्यांनी भगतसिंह कोश्यारी यांचे कौतुक केले. दिवसभरातील या सर्व प्रतिक्रिया तुम्हाला या एकाच बातमीत वाचायला मिळू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विरोधक काय म्हणाले?

महाराष्ट्राचे सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रतिक्रियेपासून सुरुवात करुयात. शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “माझ्या मते महाराष्ट्राची सुटका झाली. अतिशय चांगला निर्णय. हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी व्यक्ती कधीही राज्यपाल म्हणून झाली होती, ती आपण पाहिली. केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनी त्यात बदल केला, ही समाधानकारक बाब आहे.” वाचा सविस्तर बातमी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “आज चांगला मुहूर्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक करण्यासाठी उत्तर भारतातील अर्थात काशीमधून गागाभट्ट आले होते. आज आम्ही उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात आलो आहोत; तर, शिवाजी महाराजांचा अपमान करणारे ॲमेझॉनचं पार्सलने माघारी जात आहेत,” वाचा सविस्तर बातमी

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महापुरुषांबद्दल बेजबाबदारपणे बोलणाऱ्या आणि संविधानिक अधिकारांवर गदा आणणाऱ्या वादग्रस्त अशा भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदाची प्रतिष्ठा घालवली. मात्र, त्यांचा राजीनामा दीर्घकाळ का स्वीकारला नाही? वाचा सविस्तर बातमी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, “कोश्यारी गेले, सुटलो एकदाचे… पण देर आये दुरुस्त आये… कोश्यारी हे माफी मागणाऱ्यांमधील नव्हते. कोश्यारी म्हणाले की महाराष्ट्राचं बुद्धिजिवी लोकांनी नुकसान केलं. त्यामुळे कोश्यारींच्या मनात काय होतं, याचा राज्याने विचार करावा. महाराष्ट्रातील लोकांनी गुराढोरासारखं वागलं पाहिजे. तसेच, एकाच विचारांच्या मागे लोकं गेली पाहिजे, असं त्यांच्या मनात होते. आता नवीन राज्यपाल काय प्रताप करतील, ते पाहूया” वाचा सविस्तर बातमी

भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “जसं राष्ट्रपती हा देशाचा प्रमुख असतो, तसं राज्यपाल हे पद यावर जे कोणी विराजमान असतात ते या राज्याचे प्रमुख असतात. अशा महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींनी जबाबदारीने वक्तव्य करणं हे त्यांच्याकडून लोकांना अपेक्षित असतं. कारण नसताना कुठलही विधान करणं. ज्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे कारण नसताना जाती-जातीमध्ये मतभेद निर्माण होतात, हे कशासाठी?” वाचा सविस्तर बातमी

कोश्यांरीच्या राजीनाम्यावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोश्यारींना हे उशिराने सुचलेले शहाणपण आहे, असे संभाजीराजे म्हणाले आहेत. तसेच जुन्या राज्यपालांकडून ज्या चुका झालेल्या आहेत, त्या नव्या राज्यापालांनी लक्षात ठेवाव्यात, असा सल्लाही त्यांनी नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांना दिला आहे. वाचा सविस्तर बातमी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, “निर्लज्जम सदा सुखी, अशा पद्धतीने भाजपाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्रात उतरले होते. मविआने त्यांच्याविरोधात आंदोलन केल्यानंतर सरकारला सुचलेले हे उशीराचे शहाणपण आहे. कारण आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भगतसिंह कोश्यारींच्या अभिभाषणादरम्यान गदारोळ होणार होता, तसेच कोल्हापूरमधील दीक्षांत सोहळ्याला राज्यपालांना येऊ दिले जाणार नव्हते. कोल्हापूरवासीयांनी त्याविरोधात आंदोलन देखील केले. म्हणूनच महापुरुषांचा अपमान करणाऱ्या एका बेशरम माणसाला पदमूक्त केल्याबद्दल आम्हाला आनंद वाटत आहे” वाचा सविस्तर बातमी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “भाजपाने महाराष्ट्राची जेवढी बदनामी राज्यपालांकडून करून घ्यायची होती, ते करून घेण्याचं काम केलं. ते काम पूर्ण झालं असं भाजपाला वाटत असेल, म्हणून आता भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्राबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचं जे वक्तव्य त्यांनी केलं होतं. ते नाना पटोले आणि महाराष्ट्रातील जनता कधीही विसरू शकणार नाही. वाचा सविस्तर बातमी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, राज्यघटनेच्या विरोधात काम करून घटनाबाह्य सरकारला शपथ देणाऱ्या महोदयांमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाली. आता नवीन राज्यपाल भाजपच्या हातचे बाहुले बनणार नाहीत अशी अपेक्षा आहे. वाचा सविस्तर बातमी

आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलं आहे की, “महाराष्ट्राचा मोठा विजय! महाराष्ट्रविरोधी राज्यपालांचा राजीनामा अखेर स्वीकारला! छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आपली राज्यघटना, विधानसभा आणि लोकशाहीतले आदर्श यांचा सातत्याने अपमान करणाऱ्या व्यक्तीला राज्यपाल म्हणून स्वीकारता येणार नाही!” वाचा सविस्तर बातमी

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांचा अपमान केला, ते अतिशय दुर्देवी असून, हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच झाले नाही. कोणत्याही देशात किंवा राज्यात महापुरुषांचा अपमान करणे हे अयोग्य आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी तेच पाप केल. उशीरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाला”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. वाचा सविस्तर बातमी

तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, “भाजप किंवा केंद्राने जाणीवपूर्ण मराठी माणसाचा अपमान करण्यासाठी राज्यपालांना राज्यात पाठवलं होतं. त्यांनी नेहमीच महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावण्याचा प्रयत्न केला. जनमत हे कोश्यारींच्या विरोधात असूनही त्यांना जास्त दिवस पदावर कायम ठेवलं. परंतु सरकारने आता त्यात दुरुस्ती केली आहे. परंतु मी काही सरकारचे आभार मानणार नाही. उलट महाराष्ट्रातली घाण गेली असंच मी म्हणेन.” वाचा सविस्तर बातमी

सत्ताधारी काय म्हणाले?

राज्यपालांच्या राजीनामा प्रकरणात विरोधकांनी स्वतःची पाठ थोपटून घेण्याची काहीही गरज नाही. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. नियमानुसार त्यांनी राजीनामा दिल्यावर तो स्वीकृत करण्यात आला, यात विरोधकांचे काहीही देणे घेणे नाही, असे भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन म्हणाले. वाचा सविस्तर बातमी

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी यावर भाष्य केलं. ते म्हणाले, “भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून राजभवनात बसून राजकारभार हाकणे ऐवढंच नाही, तर ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम केलं. महाविकास आघाडीला हे काम पसंत नव्हतं. म्हणून महाविकास आघाडीने सातत्याने त्यांच्यावर आरोप केले. पण, आपल्या मूळ गावाकडे सामाजिक काम करण्याची इच्छा व्यक्त करत राज्यपालांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती” वाचा सविस्तर बातमी

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After bhagat singh koshyari step down from governor post political leader slams him sharad pawar uddhav thackeray read all comments kvg