नांदेड : राज्याच्या महसूल विभागाचे पालक समजले जाणारे या विभााचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषविणारे अतुल सावे या दोघांनीही वरील विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेकडे पाठ फिरवल्याचे शुक्रवारी येथे दिसून आले. या दोघांशिवय राज्यमंत्री योगश कदम हेही उद्घाटन सोहळ्यास आले नाहीत.महसूल खात्याशी संबंधित राज्यातल्या ७ विभागांतील दीड हजारांहून अधिक खेळाडू आणि कलावंत राज्यस्तरीय स्पर्धच्या निमित्तने या ऐतिहासिक नगरीमध्ये दाखल झाले आहेत. तब्बल एक तपाच्या खंडानंतर ही स्पर्धा होत असताना विविध क्रीडा प्रकार तसेच कलाविष्कार सादर करण्यात रुची असलेल्या महसूल कर्मचार्‍यांत उत्साह निर्माण झालेला होता, पण विभागच्या दोन्हीही मंत्र्यांनी सध्या शुभेच्छाही पाठविल्या नाहीत. त्यामुळे आयोजकांचा हिरमोड झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास हजर रहावे, यासाठी विभागीय आयुक्तांपासून स्थानिक पातळीवरील निवासी उपजिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला होता. पण बावनकुळे येणार नाहीत, हे गरुवारी सायंकाळी स्पष्ट झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना स्पर्धेच्या उद्घाटनाचा मान देण्याचे ठरले. चव्हाण आता सत्ताधारी भाजपाचे राज्यसभा सदस्य असून ज्येष्ठतेनुसार त्यांना मान देण्यात आला,तरी त्यास एका माजी खासदाराने हरकत घेतल्यामळे गुरुवारी रात्री स्थानिक आयोजकांत अस्वस्थता निर्माण झाली होती, पण शुक्रवारी कटकटी न होता उद्घाटनाचा सोपस्कार पार पडला.

या स्पर्धच्या निमित्ताने मागील २५ वर्षांत नांदेड जिल्ह्यासाठी विशेष योगदान दिलेल्या ८ माजी जिल्हाधिकार्‍यांच्या सत्काराचे नियोजन करण्यात आले.स्थानिक प्रशासनाने या सर्वांशी संपर्क साधत त्यांना येण्याची विनंती केली होती. पण उद्घाटन सोहळ्यास शरद डोंगरे आणि अभिजीत राऊत हे दोघेच हजर राहिले.वरील स्पर्धेच्या आयोजनासाठी राज्य शासनाने ५० लाख रुपये जाहीर केले. पण या स्पर्धेचे अंदाजपत्रक दोन कोटींच्या वर गेले असून शासनाच्या मदतीत जिल्ह्यातील खासदारांच्या निधीचा हातभार लागला.

उद्घाटनाचा सोहळा गुरु गोविंदसिंघजी स्टेडियमच्या हिरव्यागार मैदानावर शानदारपणे पार पडला. या निमित्ताने मैदान सजले होते, पण ४० वर्षानंतरही या स्टेडियमचे काम अर्धवट असून स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरीवर अद्यापही छत नाही. ही दूर्दशा बाहेरून आलेल्या खेळाडूंच्या नजरेत भरली.

उद्घाटन सोहळ्यात व्यासपीठावर राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधींची भाऊगर्दी झाली होती. उद्घाटनापूर्वी सर्व महसूल विभागांच्या खेळाडूंनी संचलन केले. उद्घाटक अशोक चव्हाण यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचा ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर सर्व खेळाडूंना चव्हाण यांनी स्पर्धेचे नियम पाळण्याची व सांघीक भावना जपण्याची शपथ दिली. राज्य पातळीवरील या स्पर्धेसाठी शासनाने दोन कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी महसूल संघटनांतर्फे करण्यात आली.