निवडणूक आयोगाने आज ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट यांच्यातल्या वादावर निकाल देत शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या हातून धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव शिवसेना हे दोन्ही हिरावलं गेलं आहे. या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. शुक्रवारी संध्याकाळी आलेल्या बातमीमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ठाकरे कुटुंबाकडून वेगळा झाल्याची. या सगळ्यानंतर उद्धव ठाकरेंनी सविस्तर प्रतिक्रिया देत आपली भूमिका मांडली. तर आदित्य ठाकरेंनी एक फोटो पोस्ट केला आहे.
काय आहे आदित्य ठाकरेंनी पोस्ट केलेल्या फोटोत?
मातोश्रीमधल्या एका खिडकीत बाळासाहेब ठाकरे उभे आहेत. त्यांच्या एका बाजूला उद्धव ठाकरे उभे आहेत छान हसत ते बाहेर पाहात आहेत तर दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे आहेत. हा फोटो आदित्य ठाकरेंनी इंस्टाग्राम आणि ट्विटरवर पोस्ट केला आहे. या फोटोत आदित्य ठाकरे यांचा चेहरा बराच गंभीर आहे. शिवसेनेत जून २०२२ ला जी फाटाफूट झाली त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढत पक्ष सावरण्याचा आणि कार्यकर्त्यांना नवी उभारी देण्याचा खूप प्रयत्न केला हे महाराष्ट्राने पाहिलंच आहे. मात्र आज निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर आदित्य ठाकरे यांची कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. समोर आला तो त्यांनी पोस्ट केलेला फोटोच.
सोशल मीडियावर या फोटोची चर्चा
आदित्य ठाकरेंनी आजोबा बाळासाहेब ठाकरे, वडील उद्धव ठाकरे आणि आपला फोटो पोस्ट केला आहे. तीन पिढ्या या फोटोत दिसत आहेत. तीन पिढ्यांकडे असलेला शिवसेना हा पक्ष आज निवडणूक आयोगाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला आहे. त्यामुळे आता पुढे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना संघर्ष करावा लागणार हे उघड आहे. काहीही बोलण्यापेक्षा एक फोटो पोस्ट करत आम्ही संघर्ष करणार हेच जणू या फोटोतून आदित्य ठाकरे सांगत आहेत. या फोटोची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.
लोकांच्या विविध प्रतिक्रिया
आदित्य ठाकरेंनी पोस्ट केलेल्या या फोटोवर लोकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे म्हणजेच शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच ठाकरे अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. ठाकरे सांगतील तोच आमचा पक्ष आणि ठाकरे सांगतील तेच आमचं चिन्ह असं म्हणत आणखी एका युजरनेही प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही सदैव उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबतच असंही एकाने म्हटलं आहे. या फोटोवर लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत.
जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांचं बंड झालं त्यानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. पक्षावरही एकनाथ शिंदे यांनी दावा सांगितला हा सगळा वाद सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाच्या दारात गेला. मागचे सहा महिने विविध तारखा पडत होत्या. मात्र आज निवडणूक आयोगाने निर्णय देत शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. या निर्णयावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.