जालन्यातील सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी सातव्या दिवशीही उपोषण सुरू ठेवलं आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र मिळावं, मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुद्द्यावरून त्यांनी आंदोलन छेडलं आहे. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज सरोटीत दाखल झाले असून त्यांनी मनोज सरांगे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, हे मी आधीच सांगितलं होतं. हे सगळे राजकारणी मतं पाडून घेतील आणि दुर्लक्ष करतील. हा सर्वोच्च न्यायालयातील तिढा आहे. कायद्याच्या गोष्टी समजून घ्या. हे सतत जातीचं आमिष दाखवणार. विरोधात असल्यावर आंदोलन करणार, विरोधातून सत्तेत आले की हेच गोळ्या झाडणार, तुम्हाला तुडवणार. जेव्हा हे विरोधी पक्षात असतात तेव्हा तुमची यांना दया येते, मग सत्तेत आल्यावर हेच तुम्हाला तुडवतात. या सर्व प्रकरणात पोलिसांना दोष देऊ नका. पोलिसांना आदेश कोणी दिले त्यांना दोष द्या”, असं राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> “मराठा आरक्षणाबाबत २ दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करायचा आहे असं सांगून यांनी मतं मागितली होती. मग समुद्रात फुलं टाकली. २००७-०८ पासून हा विषय आला, तेव्हापासून सांगतोय हा पुतळा होऊ शकत नाही. एवढा मोठा पुतळा उभा करणे हे अशक्य आहे. गडकिल्ले हे महाराजांचं स्मारक आहे. हे गडकिल्ले सुधारले पाहिजेत आपल्या पुढच्या पिढ्यांना सांगितलं पाहिजे की आपला राजा कोण होऊन गेला ते. पण सतत आरक्षण, पुतळ्यावरून राजकारण केलं जातं, मतं पदरात पाडून घ्यायची. मते मिळाली की विसरून जायचं”, अशी टीकाही त्यांनी केली.

मराठवाड्यात बंदी घाला

राज ठाकरे पुढे म्हणाले की, “मी विनंती करायला आलोय की ज्या लोकांनी तुमच्यावर काठ्या बरसावल्या, बुलेट बंदुकीतून मारायला लावल्या त्या सर्व लोकांना मराठवाड्यात बंदी करून टाका. पाऊल ठेवू देऊ नका. जोपर्यंत केलेल्या गोष्टीची माफी मागत नाहीत तोवर त्यांना मराठवाड्यात बंदी घाला”, असं आवाहनही राज ठाकरेंनी आंदोलकांना केलं.

हेही वाचा >> “गेंड्याच्या कातडीच्या या राजकारण्यांसाठी तुम्ही…”, जालन्यात मनोज जरांगेची भेट घेतल्यावर राज ठाकरेंचा घणाघात

देवेंद्र फडणवीसांवर टीका

“काल फडणवीस म्हणाले की झालेल्या गोष्टीचं राजकारण करू नये. हे जर विरोधी पक्षात असते तर काय केलं असतं? हेच केलं असतं ना राजकारण. मी काही राजकारण करायला आलो नाही. ज्या पद्धतीने माता भगिंनींवर लाठ्या बरसत होत्या, ते पाहून येथे आलो. इथे येऊन जरांगे पाटलांशी चर्चा केली. आता मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर घालीन. यातून काय मार्ग निघेल माहित नाही. पण मला या लोकांसारखं खोटं बोलता येत नाही. उगाच आमिषं दाखवणं, खोटं बोलणं मला जमत नाही. त्या विषयात मुख्यमंत्र्यांशी बोलेन. विषय सुटण्यासारखा असेल तर निश्चित सोडवू, असं आश्वासनही राज ठाकरेंनी दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After discussion with manoj jarange patal raj thackeray attacked home minister devendra fadnavis said sgk
Show comments